Prime Minister’s address to the program organized on the occasion of Civil Services Day
प्रधानमंत्र्यांचं नागरी सेवा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधन
भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेबद्दल 16 जणांना केले पंतप्रधान पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली :: एखाद्या अधिकाऱ्याच्या यशाचं मूल्यमापन त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरून नव्हे, तर त्याच्या कामामुळे किती लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं, यावरून होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं नागरी सेवा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ देशाच्या हिताचाच विचार करून निर्णय घ्यावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्याच्या अमृत काळात, नव्या भारताच्या निर्मितीमध्ये युवा प्रशासकीय अधिकारी महत्वाची भूमिका बजावणार असून, अमृत काळात आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न पूर्ण करणं, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.
जागतिक पातळीवर भारताची उंचावत चाललेली प्रतिमा, गरिबातील गरिबाचा ‘सुशासन’ या संकल्पनेवर वाढत चाललेला विश्वास आणि देशाच्या विकासाला मिळालेली नवी चालना याबद्दल त्यांनी मिशन ‘कर्मयोगी’ च्या भूमिकेची प्रशंसा केली
विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, ‘पंच प्रणां’नी दिलेली प्रेरणा, देशाला अभूतपूर्व उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यंत्रणेतल्या उणिवांचं आता कार्यक्षमतेत रूपांतर झालं असून, ही कार्यक्षमता धोरणांशी संबंधित विविध प्रश्न सोडवण्यामध्ये सरकारला मदत करत असल्याचं ते म्हणाले.
गेल्या नऊ वर्षांतील कामगिरीने भारताला खूप मोठी झेप घेण्यास तयार केले आहे याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. भारत डिजिटल पेमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि मोबाईल डेटा सर्वात स्वस्त असलेल्या देशांपैकी एक आहे, ते म्हणाले, देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलत आहे, असं नमूद करून, प्रधानमंत्री म्हणाले की, कोविड-१९ महामारीचं आव्हान असूनही, भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था ठरली आहे.
पूर्वीच्या व्यवस्थेमुळे चार कोटी बनावट गॅस कनेक्शन, चार कोटी बनावट रेशनकार्ड होते आणि अल्पसंख्याक मंत्रालय ३० लाख बनावट तरुणांना शिष्यवृत्तीचा लाभ देत होते यावर पंतप्रधानांनी भर दिला.
‘देश सर्वप्रथम, नागरिक सर्वप्रथम’, हा आपल्या सरकारचा मंत्र असून, प्रत्येकाची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून, वेळ आणि साधन संपत्तीचा कार्यक्षमतेने वापर करत आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सार्वजनिक प्रशासनामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री पुरस्कार प्रदान केले. तसंच ‘विकसित भारत- एम्पॉवरिंग सिटिझन्स’ आणि ‘रीचिंग द लास्ट माईल’, या ई -पुस्तकांचं प्रकाशन केलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com