प्राप्तिकर विभागाचे पुण्यामध्ये छापे.
प्राप्तिकर विभागाने 25 नोव्हेंबर 2021 रोजी पुण्यामधल्या दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित एका नामवंत समूहावर छापे घातले आणि शोध आणि जप्ती प्रक्रिया राबवली. या छाप्यांतर्गत देशभरातील 6 शहरांमध्ये असलेल्या 30 पेक्षा जास्त संकुलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.
या तपासादरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि कर चुकवल्याचे पुरावे सापडले आहेत आणि ते जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या प्राथमिक छाननीदरम्यान हे स्पष्ट दिसून आले की बनावट खरेदी, बेहिशोबी रोख रकमेद्वारे विक्री, रोख रकमेच्या कर्जाचे व्यवहार आणि त्यांचा चुकारा, स्पष्टीकरण देता न येणारे रोखीचे कर्जव्यवहार इत्यादी गैरप्रकाराचा अवलंब करून करपात्र रक्कम लपवण्यात आली. त्याच प्रकारे पशुधनाची विक्री किंवा मृत्यू दाखवून नुकसान झाल्याचे चुकीचे दावे करण्याच्या प्रकारांची देखील दखल घेण्यात आली आहे.
तसेच संबंधित समूहाने आपल्या करपात्र उत्पन्नात विशिष्ट कपातीचा दावा करण्यासाठी योग्य प्रकारची आणि स्वतंत्र खातेवह्या ठेवल्या नसल्याचे उघड करणारे पुरावे देखील सापडले आहेत.
या शोधमोहिमेत रोख रक्कम आणि स्पष्टीकरण नसलेले दागिने असे मिळून सुमारे 2.50 कोटी रुपयांची सामग्री जप्त करण्यात आली. तर काही बँक लॉकरची तपासणी अद्याप बाकी आहे. या शोधमोहिमेत आतापर्यंत 400 कोटी रुपयांहून जास्त बेहिशोबी उत्पन्नाची माहिती मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे.