प्राप्तिकर विभागाचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे.
प्राप्तिकर विभागाने दिनांक 27.10.2021 रोजी महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयात आणि एका शाखेत छापे टाकत जप्तीची कारवाई सुरू केली. बॅंकेचे अध्यक्ष आणि एका संचालकाच्या निवासस्थानाचाही यात समावेश होता.
कोअर बँकिंग सोल्युशन्स (CBS) वरील बँकेच्या डेटाचे विश्लेषण आणि शोध कारवाईदरम्यान नोंदवलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवेदनावरून या बँकेत नवीन खाती उघडण्याप्रकरणी अनियमितता झाल्याचे उघडकीस आले आहे. या शाखेत 1200 हून अधिक नवीन बँक खाती पॅनकार्डाशिवाय उघडण्यात आली आहेत. केवायसी नियमांचे पालन न करता ही बँक खाती उघडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे आणि खाती उघडण्याचे सर्व फॉर्म बँक कर्मचाऱ्यांनीच भरले आहेत आणि त्यावर त्यांनी त्यांच्या स्वाक्षरी/अंगठ्याचे ठसे उमटवलेले आहेत.
या सर्व खात्यांत, प्रत्येकी 1.9 लाख,रु.च्या इतक्या मूल्याच्या रोख ठेवी असून त्यांचे एकूण मूल्य रु. 53.72 कोटी इतके आहे. यापैकी रु. 34.10 कोटी पेक्षा जास्त ठेवी असलेली 700 हून अधिक बँक खाती उघडकीस आली आहेत, ज्यात प्रामुख्याने ऑगस्ट, 2020 ते मे, 2021या कालावधीत ही बँक खाती उघडल्यापासून 7 दिवसांच्या आत 34.10 कोटी रुपयांच्या ठेवी ताबडतोब ठेवण्यात आल्या होत्या. 2 लाख.रु. पेक्षा जास्त रोख ठेवींसाठी अनिवार्य अशा पॅन कागदपत्रांची असलेली गरज टाळण्यासाठी या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. नंतर हीच रक्कम त्याच शाखेतील मुदत ठेवींमध्ये रूपांतरित केली गेली आहे.
काही खातेदारांच्या स्थानिक चौकशीत असे दिसून आले आहे, की त्या व्यक्तींना बँकेतील या आपल्या अशा रोख ठेवींची अजिबात कल्पना नाही आणि त्यांनी अशा बँक खात्यांची किंवा अगदी मुदत ठेवींची कोणतीही माहिती असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.
बँकेचे अध्यक्ष, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, आणि शाखा व्यवस्थापक,या रोख ठेवींचे स्त्रोत स्पष्ट करू शकले नाहीत आणि त्यांनी हे मान्य केले की हे काम त्यांनी धान्याच्या व्यापारात गुंतलेल्या एक प्रमुख स्थानिक व्यापारी,जो बँकेच्या संचालकापैकी एक आहे,त्याच्या सांगण्यावरून केले गेले होते.
जमा केलेले पुरावे आणि नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे निश्चित झालेली संपूर्ण रक्कम रु. 53.72 कोटी असून ती ताब्यात घेण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.