Football Maharashtra Center of Excellence will create a world-renowned Indian team – Chief Minister Uddhav Thackeray.
फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन.
मुंबई: नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईत, खारघर इथं फुटबॉल एक्सलन्स ऑफ सेंटर (Centre of Excellence) अर्थात, उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आज झालं, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे.
खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.
खारघर हे शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा भारताचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर भारताच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.