बँक ऑफ महाराष्ट्रला “ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा सर्वोत्तम बँकिंग भागीदार” म्हणून पुरस्कार जाहीर.
देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रला “ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा सर्वोत्तम बँकिंग भागीदार “ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. झी बिसिनेस तर्फे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी आयोजित “झी राष्ट्रीय सम्मेलन” या कार्यक्रमात भारत सरकारच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती अलका नांगिया अरोरा यांच्या शुभहस्ते बँक ऑफ महाराष्ट्रला “सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा सर्वोत्तम बँकिंग भागीदार” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांशी संवाद साधताना बँकेने सध्याच्या कठीण काळात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी योजलेल्या विविध उपाययोजनांची व देऊ केलेल्या विविध सोयी व सुविधांची माहिती दिली. अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून व शक्य तितका डिजिटल मंचाचा उपयोग करून बाजारपेठेतील बदलत्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेण्यावर श्री राजीव यांनी भर दिला. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे देशाच्या भविष्यातील आकांक्षा साकार व साध्य करण्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढीचा व विकासाची भूमिका महत्वाची राहणार असल्याचा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला व बँक ऑफ महाराष्ट्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचे नमूद केले
बँकेच्या प्रामाणिक प्रयत्नांची व पुढाकारांची योग्य ती दखल घेउन त्यासाठी पुरस्कार दिल्याबद्दल बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांनी झी व्यवसाय समूह व भारत सरकारच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती अलका नांगिया अरोरा यांचे आभार मानले. अशा कठीण काळात अविरत सेवा देऊन हा टप्पा साध्य केल्याबद्दल श्री हेमंत टम्टा यांनी बँकेच्या कर्मचारी वर्गाचे देखील कौतुक केले.
बँकेच्या रिटेल व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कर्ज विभागाचे सरव्यवस्थापक श्री सुर्यकांत सावंत यांनी यानिमित्य आयोजित चर्चासत्रात सहभागी होऊन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी व शाश्वत विकास साध्य करण्याचा कानमंत्र दिला व त्यासाठी कोणत्या दिशेने व कसे प्रयत्न करावेत याविषयी मार्गदर्शन केले.