Integrated humanitarianism should be awakened for a strong India
बलशाली भारतासाठी एकात्म मानवतावादाचा जागर व्हावा
– कुलगुरू डॉ.कारभारी काळे
साहित्यिकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा
पुणे : लेखन करणे ही सोपी गोष्ट नाही. आजुबाजूच्या जगातले दुःख हेरून आणि माणसा माणसातील दुही नष्ट होण्याचा प्रयत्न साहित्यिकांनी करायला हवा, अनेक साहित्यिक हे करत आहेत. त्यांनी आपल्या लेखनातून एकात्म मानवतावादाचा जागर केला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बलशाली भारत निर्माण होईल, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, विद्यार्थी विकास मंडळ, मातंग साहित्य परिषद आणि समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मश्री दादा इदाते, पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांना कृतज्ञता सन्मान व महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या साहित्यकृतीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार वितरण समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी डॉ.कारभारी काळे बोलत होते.
याप्रसंगी पद्मश्री दादा इदाते यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, “म.ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रात सामाजिक कृतज्ञता प्रथमतः रुजवली त्यांच्या “विद्येविना मती गेली “या वाक्यापासून प्रेरणा घेऊन मी कोकणात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. बोलण्याच्या ओघात त्यांनी ‘साहित्यरत्न असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची एकाही मराठी समीक्षकांनी दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त केली.
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोळकर यांनी “सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक” असा साहित्य मंत्रच आम्हाला दिला. यानिमित्ताने डॉ.आनंद यादव यांची आठवण झाली. त्यांनी समरसता हे जीवनमूल्य आहे असा उद्घोष केला. आम्हाला सामाजिक समरसता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सामाजिक जीवनातील सर्वांचा एकत्रित विचार करणे म्हणजेच समरसतेचा विचार करणे होय असेही पद्मश्री दादा इदाते ते यांनी मांडले.
पद्मश्री रमेश पतंगे म्हणाले की, असा पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा आम्ही कधीच केली नव्हती. पद्मश्री पुरस्काराची गोष्टच वेगळी होती. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो कार्यकर्त्यांनी आमचे अभिनंदन केले. हा पुरस्कार पतंगे – इदाते यांना मिळाला नाही तर तो फळाची अपेक्षा न करता कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा सत्कार आहे”आणि म्हणूनच तुमच्या सर्वांच्या वतीने राष्ट्रपतींकडून मी हा पुरस्कार स्वीकारला आहे.” ते पुढे म्हणाले, विश्वात्मके देवे हे ज्ञानदेवांचे पसायदान कार्यक्रमाच्या शेवटी फक्त म्हणायचे नसते तर ते आचरणात आणायचे असते.”
या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, “सर्वच विद्यापीठांमध्ये संशोधन चालू असते मात्र संशोधन कृतीत यावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे नैसर्गिकरित्या भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे पंथ, वेगवेगळे विचार असले तरी माझा भारत एक आहे. ही एकता बळकट करण्यासाठी आधुनिक भारतातले शिक्षण हे प्रबळ शस्त्र आहे याची जाणीव ठेवून अध्यासनांनी काम करण्याची गरज आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख डॉ सुनील भंडगे यांनी केले तर आभारप्रदर्शन व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर केले. सूत्रसंचालन डॉ.प्रसन्न पाटील यांनी केले.
७० साहित्यिकांच्या यादीचे वाचन डॉ.धनंजय भिसे यांनी केले. यामध्ये डॉ.श्यामा घोणसे, संपत जाधव, डॉ.रविंद्र रारावीकर, शाहीर शिवाजीराव पाटील आदी ७० लेखकांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाङमय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com