बार्टी येरवडा येथे यूपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरु करणार -महासंचालक धम्मज्योती गजभिये.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत अनुसूचित जातीचा टक्का वाढावा म्हणून बार्टीकडून येरवडा येथे यूपीएससी निवासी प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच यूपीएससी २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.
बार्टीच्या सभागृहामध्ये बार्टी पुरस्कृत व यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार श्री.गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाला आयकर विभागाचे उपायुक्त मुकुल कुलकर्णी व रुपेश शेवाळे उपस्थित होते.
श्री.गजभिये म्हणाले, कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी कष्ट करून यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२० यश मिळविले. या यशाने मोठी जबाबदारी येणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी करून उच्च पदावर विराजमान झाले तरी आदर्शवाद जपला पाहिजे, असे ते म्हणाले.
युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी शरण कांबळे व अजिंक्य विद्यागर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सुहास गाडे, स्वप्नील निसर्गन, पियुष मडके या यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा ऑनलाइन सहभाग नोंदविला. बार्टी संस्थेने केलेल्या मदतीमुळे व मुलाखतीचे ऑनलाईन मार्गदर्शनामुळे यशस्वी झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी बार्टीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.