भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विनम्र अभिवादन.
सशक्त प्रजासत्ताकाच्या योगदानासाठी व्यक्त केली कृतज्ञता.
मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनध्यास होता. त्यासाठीच त्यांनी ज्ञानसाधना केली. समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी आपल्या विद्वत्तेचा विनियोग केला. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान हे एक कारण आहे. यातून एक सशक्त असे प्रजासत्ताक राष्ट्र उभे राहू शकले. डॉ.आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपण सर्व कृतज्ञ राहूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी कटीबद्ध होऊया. भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
कोरोना प्रकोप आणि संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. गर्दी टाळावी, आरोग्य नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.