आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपथी औषधांची सुरक्षितता आणि उत्तम गुणवत्ता याबाबत जागतिक समुदायामध्ये विश्वास विकसित करण्यासाठी सहयोग.
महत्वपूर्ण पाऊल उचलत भारताच्या पीसीआयएम अॅन्ड एच आणि अमेरिकी हर्बल फार्माकोपिया यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.
आयुर्वेदिक आणि इतर पारंपारिक भारतीय औषध उत्पादनांची गुणवत्ता जागतिक स्तरावर, विशेषकरून अमेरिकी बाजारपेठेत बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या निर्यातीच्या संधी वृद्धींगत करण्यासाठी आयुष मंत्रालयाने महत्वाचे पाऊल उचलत यासाठी मार्ग मोकळा केला आहे. यासंदर्भात फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अॅन्ड होमिओपॅथी आणि अमेरिकन हर्बल फार्माकोपिया यांच्यात 13 सप्टेंबर 2021 ला सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दुरदृष्य प्रणालीद्वारे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशात परस्पर लाभदायी आणि समानता या आधारावर आयुर्वेद आणि इतर भारतीय पारंपारिक औषध प्रणालीला प्रोत्साहन, मानक विकास आणि बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालयाने हा करार केला आहे.
या प्रयत्नपूर्वक सहयोगामुळे आयुर्वेद, सिध्द, युनानी आणि होमिओपॅथी औषधांच्या निर्यात संधीत दीर्घकालीन वाढ अपेक्षित आहे.
या सामंजस्य करारामुळे आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपथी औषधांविषयी जागतिक समुदायामध्ये विश्वास विकसित होईल अशी आयुष मंत्रालयाची अपेक्षा आहे.
अमेरिकेत आयुर्वेद उत्पादने आणि हर्बल बाजार पेठेत सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांवर, पीसीआयएम अॅन्ड एच आणि एएचपी दोन्ही एकत्रितपणे काम करतील ही या कराराची मोठी फलश्रुती राहील. ही महत्वाची बाब असून आयुर्वेद, सिध्द आणि युनानी तसेच होमिओपॅथी उत्पादने आणि औषधांना अमेरिकी बाजारपेठेसाठी, या सहकार्यातून विकसित आयुर्वेद मानकांचा स्वीकार करण्याला चालना मिळणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातला हा सामंजस्य करार म्हणजे, आयुर्वेद आणि इतर पारंपरिक भारतीय औषधांची गुणवत्ता देशात आणि जागतिक स्तरावरही बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून सुरु असलेल्या उपक्रमांना, अधिक गती देण्याच्या दिशेने वेळेवर उचललेले पाऊल आहे.
सध्याच्या संसर्गाला प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता वाढवण्यामध्ये आयुर्वेद, सिध्द आणि युनानी तसेच होमिओपॅथी औषधांची भूमिका तथ्यावर आधारित आणि प्रशंसनीय आहे. या प्रणालीचा जागतिक स्वीकार आणि प्रोत्साहन याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुष मंत्रालय काम करत आहे.