BIS raids toy-shop in Goregaon West confiscates uncertified toys.
भारतीय मानक ब्यूरोने गोरेगाव पश्चिममधील खेळण्यांच्या दुकानात छापा घालून अप्रमाणित खेळणी केली जप्त.
मुंबई: भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने, शनिवारी (15 जानेवारी 2022) रोजी मुंबईतील गोरेगाव भागातल्या ओबेरॉय मॉलमधल्या मेसर्स हैमलेज (मेसर्स रिलायन्स ब्रॅंडस लिमिटेड) या दुकानावर छापे घातले.
या दुकानात, इलेक्ट्रिक आणि बिगर-इलेक्ट्रिक खेळण्यांची प्रमाणित चिन्हाविना (बीआयएस स्टँडर्ड मार्क) विक्री सुरु होती. हे केंद्र सरकारने खेळण्यांच्या दर्जाबाबत जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन असल्याचे सिद्ध झाले आहे. या छाप्यादरम्यान अनेक अप्रमाणित खेळणी देखील जप्त करण्यात आली.
मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार, 1 जानेवारी 2021 नंतर भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व खेळण्यांवर भारतीय मानक ब्युरोचे सुरक्षिततेविषयक प्रमाणपत्र आणि मुद्रा म्हणजेच मार्क असणे अनिवार्य आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्यास, बीआयएस कायदा 2016 कायद्यानुसार, तो दंडनीय अपराध असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा किमान 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. त्यामुळे खेळणी उत्पादक, वितरक आणि व्यापारी यांनी, बीआयसने प्रमाणित न केलेली खेळणी बनवू अथवा विकू नयेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
ग्राहकांनीही, प्रमाणित उत्पादक तसेच उत्पादनांची माहिती मिळवण्यासाठी, बीआयएस केअर अॅप चा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.