“भारतीय वाहन उद्योगाने या उदयोन्मुख क्षेत्रातील मधल्या उत्तम संधींचा लाभ करून घ्यायला हवा” – डॉ.पांडेय.
भारतीय वाहन क्षेत्राने जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करायला हवे आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या जागतिक बाजारात अधिकाधिक वाटा मिळवण्यसाठी प्रयत्न करायला हवेत : केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्र नाथ पांडेय
वाहन उद्योगाच्या विकासामुळे आपल्याला पंतप्रधानांनी कॉप-26 परिषदेत दिलेल्या “पंचामृता”च्या वचनाची पूर्तता करण्यास नक्कीच मदत होईल आणि त्यातून भारतीय युवावर्गाला रोजगाराच्या अगणित संधी उपलब्ध होतील: डॉ.पांडेय
भारतातील वाहन उद्योगाने जागतिक पातळीवर स्वतःला सिध्द करायला हवे आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या जागतिक बाजारात आपले स्थान अधिकाधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी व्यक्त केले. या प्रयत्नामुळे या उद्योगांना अधिक मोठा आकार आणि उच्च दर्जा गाठणे शक्य होईल.
विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने आज गोव्यात आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. वाहन उद्योगात आज इलेक्ट्रिक वाहनांचे क्षेत्र नव्याने उदयास येत आहे. या उदयोन्मुख क्षेत्रातील उत्तम संधींचा लाभ करून घेण्याचे आवाहन त्यांनी भारतीय वाहन उद्योगाला केले. “या उद्योगांना जागतिक दर्जा गाठता येईल आणि आंतराष्ट्रीय पातळीवर स्वीकारली जातील अशी दर्जेदार उत्पादने तयार करता येतील.” असे ते म्हणाले.
वाहन उद्योगाच्या विकासामुळे आपल्याला पंतप्रधानांनी कॉप-26 परिषदेत दिलेल्या “पंचामृता”च्या वचनाची पूर्तता करण्यास नक्कीच मदत होईल आणि त्यातून भारतीय युवावर्गाला रोजगाराच्या अगणित संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला.
वाहन तंत्रज्ञानातील भविष्य म्हणून ‘विजेवर चालणाऱ्या वाहनांना’ मोठे प्रोत्साहन देण्यात आल्यामुळे जागतिक पातळीवरील वाहन उद्योगविषयक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडून येत आहे याचा देखील त्यांनी ठळकपणे उल्लेख केला.
विजेवर चालणाऱ्या वाहनांचे सुटे भाग तयार करण्याच्या उद्योगांतील अभिनव संशोधने आणि तांत्रिक प्रगती यामुळे या बदलाला जोरकस हातभार लागत आहे. म्हणूनच, भारतातील विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला आणि या वाहनांच्या वापराला अधिक गती मिळवून देणे अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले.
डॉ. महेंद्र नाथ पांडेय म्हणाले, “आपण भारताला विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीचे मोठे केंद्र म्हणून घडविण्याची गरज आहे.” 2030 पर्यंत विजेवर चालणाऱ्या वाहन यंत्रणेकडे भारताचे स्थित्यंतर झाल्याने आयात केलेल्या तेलाचा वापर कमी झाला, तर, सुमारे 20 लाख कोटींची बचत होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.