भारत आपली स्वच्छ शहरे जाहीर करून त्यांना देणार पुरस्कार.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची सर्वोत्तम काळजी घेणाऱ्या शहरांचा राष्ट्रपती करणार सन्मान
नाले आणि मलनि:स्सारण वाहिन्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांची (सेप्टिक टँक) सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी 246 शहरांनी ‘सफाईमित्र सुरक्षा आव्हाना’ मध्ये घेतला भाग
राष्ट्रपती, श्री राम नाथ कोविंद, 20 नोव्हेंबर 2021 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमओएचयुए) आयोजित ‘स्वच्छ अमृत महोत्सवात’ स्वच्छ सर्वेक्षण (एसएस) 2021 पुरस्काराने, विजेत्यांना सन्मानित करतील.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान- शहरीक्षेत्र 2.0 अंतर्गत कचरामुक्त भारताच्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर, या समारंभात कचरामुक्त शहरांसाठी स्टार तारांकीत मानांकन नियमांनुसार (रेटिंग प्रोटोकॉल अंतर्गत) प्रमाणित शहरांना पुरस्कारही दिला जाईल. मंत्रालयाने यापूर्वी सुरू केलेल्या सफाईमित्र सुरक्षा आव्हान स्पर्धे अंतर्गत सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांची नोंद करुन हा महोत्सव स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव करेल.
माननीय पंतप्रधानांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी स्वच्छ भारत अभियान – शहरी क्षेत्र 2.0 ची सुरुवात केल्यापासूनचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत अनेक शहरांमधे सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 2016 मधील 73 प्रमुख शहरांच्या सर्वेक्षणातून, 2021 मध्ये 4,320 शहरांनी भाग घेतला आहे, सहावे स्वच्छ सर्वेक्षण जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण बनले आहे. कोविड महामारीमुळे प्रत्यक्ष जागेवर अनेक आव्हाने असतानाही 2021 चे सर्वेक्षण 28 दिवसांच्या विक्रमी कालावधीत आयोजित केले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्ये आणि शहरांच्या कामगिरीमध्ये प्रत्यक्ष जागेवर लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत.
उदाहरणार्थ,
- 6 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या एकूण प्रत्यक्ष जागेवरील कामगिरीमध्ये एकूण सुधारणा (5 ते 25% दरम्यान) दर्शविली आहे.
- 1,100 हून अधिक अतिरिक्त शहरांनी स्त्रोत वेगळे करणे सुरू केले आहे;
- जवळपास 1,800 अतिरिक्त पालिकांनी (ULB ने) त्यांच्या स्वच्छता कामगारांना कल्याणकारी लाभ देणे सुरू केले आहे;
- 1,500 हून अधिक अतिरिक्त पालिकांनी विघटन न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर, विक्री आणि साठवण यावर बंदी घातली आहे; एकूण, 3,000 पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही बंदी घातली आहे.
- ईशान्येकडील सर्व राज्यांनी त्यांच्या नागरिकांच्या अभिप्रायामध्ये लक्षणीय सुधारणा दर्शविली आहे – अभियान प्रत्येक नागरिकापर्यंत कसे पोहोचत आहे याची ही आणखी एक साक्ष आहे, ज्यामध्ये दुर्गम भागांचाही समावेश आहे.
स्वच्छ अमृत महोत्सव हा स्वच्छ भारत अभियान – शहरी क्षेत्र 2.0 च्या स्वच्छता प्रवासात अग्रभागी असलेल्या सफाईमित्रांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठीचा दृढ लक्ष केंद्रित उपक्रम आहे.
गेल्या सात वर्षांत, हे अभियान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, ‘लोक प्रथम’ केंद्रस्थानी ठेवून याने असंख्य नागरिकांचे जीवन बदलले आहे.
सर्वांना स्वच्छता सुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर 1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान- शहरी क्षेत्र 2.0 लक्ष केंद्रित करेल. 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये संपूर्ण द्रव कचरा व्यवस्थापन केले जाईल. यानुसार स्वच्छ भारत अभियान- शहरी क्षेत्र 2.0 अंतर्गत सादर करण्यात आलेल्या नवीन घटकाप्रमाणे, सर्व सांडपाणी सुरक्षितपणे साठवले जाईल, संकलित केले जाईल, वाहतूक केले जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल जेणेकरून कोणतेही सांडपाणी आपल्या जलस्रोतांना प्रदूषित करणार नाही.