भारत- कझाकस्तान संयुक्त प्रशिक्षण सराव 30 ऑगस्ट 2021 पासून सुरु होणार
लष्करी राजनीतीचा भाग म्हणून आणि कझाकस्तानबरोबरचे वाढते धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत- कझाकस्तान संयुक्त प्रशिक्षण सराव काझिंद -21 येत्या 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. कझाकस्तानमधल्या आयेशा बीबी, ट्रेनिंग नोड इथे होणारा हा सराव 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करामधल्या या सरावामुळे भारत आणि कझाकस्तान यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधाना प्रोत्साहन मिळणार आहे.
भारतीय लष्करी पथकाचे नेतृत्व बिहार रेजिमेंटची तुकडी करणार असून त्यात 90 जणांचा समावेश राहील. कझाकस्तान लष्कराच्या पथकाचे नेतृत्व पलटण गट करणार आहे.
भारत आणि कझाकस्तान यांच्या लष्कराला, संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाराच्या चौकटीत राहून, डोंगराळ, ग्रामीण भागात, बंडखोरी विरोधी आणि दहशतवाद विरोधी प्रशिक्षणाची संधी हा सराव प्रदान करेल. व्यावसायिक आदान-प्रदान, शस्त्रात्र कौशल्याबाबत विशेष ज्ञान, दहशतवाद विरोधी कारवाईतले अनुभव सामायिक करणे यांचा यात समावेश आहे. 48 तासांच्या प्रदीर्घ सरावाने याची सांगता होणार असून अर्ध ग्रामीण भागात लपलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासंदर्भातल्या कारवाईचे दर्शन यातून घडवले जाणार आहे.
परस्पर विश्वास, आंतर- संचालन दृढ करण्याबरोबरच भारत आणि कझाकस्तान यांच्या लष्करातल्या उत्तम बाबींची देवाण-घेवाण यामुळे शक्य होणार आहे.