मताधिकार जागृतीसाठी; ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा अनोखा उपक्रम.
पुणे : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. स्पर्धेअंतर्गत निवडलेल्या विषयांची छायाचित्रे आणि चित्रफीती दि. 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईनरित्या स्वीकारण्यात येणार आहेत.
मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर नवीन मतदार नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष किंवा अधिक वय असलेले नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहेत.
महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जाते. याच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. त्यासाठी ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ ही संकल्पना ठेऊन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावे.
आकाशदिवा आणि रांगोळी यामध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावा. डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीनचा वापर करावा. शिवाय मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा. मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करण्याचा संदेश देण्यात यावा.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य 15 नोव्हेंबरपर्यंत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपयांचे पहिले पारितोषिक, सात हजार रुपयांचे दुसरे, पाच हजार रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक तसेच; प्रत्येकी एकहजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले आहे.
स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.
आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा
आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याची विविध कोनांतून काढलेली जास्तीत जास्त 5 एमबी आकाराची व जेपीजी फॉरमॅटमधील तीन छायाचित्रे पाठवावीत. छायाचित्रावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
टांगलेल्या आकाशदिव्याचे संपूर्ण दर्शन होईल अशी कमीत-कमी 30 सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची ध्वनीचित्रफीत पाठवावी. चित्रफितीची (व्हिडिओची) साइज जास्तीत-जास्त 300 एमबीपर्यंत आणि एमपी4 फॉरमॅटमध्ये असावी. चित्रफितीत कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.
रांगोळी स्पर्धा
लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांनाच अनुसरून काढण्यात आलेल्या रांगोळीची विविध कोनांतून काढलेली जास्तीत जास्त 5 एमबी आकाराची व जेपीजी फॉरमॅटमधील तीन छायाचित्रे पाठवावीत. छायाचित्रावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
दोन्ही स्पर्धेसाठीची छायाचित्रे आणि चित्रफीत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावीत. आकाशदिवा आणि रांगोळी यामध्ये घोषवाक्यांचा वापर केला असेल तर गुगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.
लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये आकाशदिवा स्पर्धकांचे साहित्य प्रसारित केले जाईल. तेव्हा उत्कृष्ट आकाशदिवा स्पर्धकांनी आपले साहित्य जपून ठेवावे. कार्यालय स्पर्धकांशी स्वतंत्रपणे संपर्क साधेल, असेही