मध्यमवर्गीय भारतीयाच्या जीवनात असलेला विनोद माझ्या पात्रांना प्रेरणा देतो : इफ्फीच्या संवाद सत्रात मनोज वाजपेयी यांचे मनोगत.
भारतातील सहजसुंदर सहअस्तित्व ओटीटी आणि बिग स्क्रीन यांच्यातही पाहायला मिळेल : अपर्णा पुरोहित.
सशक्त कथा ही ओटीटीची गरज : सामंथा.
“मी कधीच व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ करण्याचा प्रयत्न करत नाही. मी नेहमीच वास्तवात जगण्याचा आणि व्यक्तिरेखा जनतेतली प्रतिनिधी वाटेल, याप्रकारे साकारण्याचा प्रयत्न करतो. गोव्यात 52 व्या इफ्फी दरम्यान आयोजित ‘क्रिएटिंग कल्ट आयकॉन्स: इंडियाज ओन जेम्स बॉण्ड’ स्वतःचे जेम्स बाँड विथ द फॅमिली मॅन’ या विषयावरील संवाद सत्रात’ प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी आपल्या मनोगतात हे सांगितले.
मध्यमवर्गीय भारतीयाच्या जीवनात विनोद पुरेपूर भरलेला आहे आणि तो आपल्या सर्व पात्रांमागचा संदर्भ आणि प्रेरणा असल्याचे मनोज यांनी सांगितले.
‘द फॅमिली मॅन’ ही मध्यमवर्गीय भारतीय माणसाची एक उत्तम कथा आहे. नोकरीत कामाच्या ओझ्याने दबलेला आणि प्रचंड अपेक्षा बाळगणारे त्याचे कुटुंब अशी पार्श्ववभूमी असलेला हा माणूस आपल्या जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतो.
‘द फॅमिली मॅन’ चे दिग्दर्शक राज निदिमोरू व कृष्णा डीके, जे राज आणि डीके नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांनीही या सत्राला संबोधित केले. संपूर्ण भारताला आपलीशी वाटेल अशी कथा साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
समंथा रूथ प्रभू ही तेलुगू आणि तमिळ चित्रपट सृष्टीतली नामवंत अभिनेत्री आहे. या वेबमालिकेविषयीच्या संवाद सत्रात बोलताना समंथा म्हणाली, ‘‘ या वेबमालिकेतली तिची ‘राजी’ची भूमिका सर्वात आव्हानात्मक होती. या भूमिकेची तयारी करण्यासाठी आपण अनेकांची मदत घेतली तसेच खास प्रशिक्षणही घेतले.
ओटीटी मंचाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना समंथा म्हणाली, ओटीटी या व्यासपीठाला सशक्त कथानकाची गरज असते आणि त्याचबरोबर पात्रांना सहानुभूतीची मागणी करणारा मंच आहे.
अॅमेजॉन प्राइम इंडिया ओरिजनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी यावेळी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी टीम निर्मात्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना कथांची विचारणा करीत होती. पुढे त्या म्हणाल्या, ‘‘भारतामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये सहअस्तित्व ही संकल्पना अतिशय सुंदरपणे नांदते. त्याचप्रमाणे ओटीटी आणि मोठा पडदा यांचेही असेच सहअस्तित्व असेल. आकर्षक, खिळवून ठेवणारी सामुग्री- साहित्य नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करतो. आम्ही कलेच्या सामर्थ्यामुळे महामारीच्या सर्वात अवघड टप्प्यातही झपाट्याने वृद्धी करू शकलो.’’
या संवाद सत्राचे सूत्र संचालन अभिनेता अंकूर पाठक याने केले. सत्राच्या प्रारंभी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांच्या हस्ते संवादामध्ये सहभागी होत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद उपस्थित होते.