मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना न्यायालयीन पदांसाठी विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण.
मराठा,कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे मार्फत प्रायोजित केले आहे. विद्यार्थ्यांना दरमहा रुपये 8,000 विद्यावेतन आणि प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार असून, प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2021 आहे. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांची निवड केली जाते. त्यातील काही अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढतीसुध्दा मिळते. या प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी; सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना माहे रु.8,000/ मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन देण्याबाबत व त्याचे प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देणेबाबत संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. साधारणत: 400 विद्यार्थ्यांना या मार्फत दरवर्षी लाभ देण्यात येणार आहे.
या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सारथीसंस्थे मार्फत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी विधी पदवीधर किंवा वकील, ॲटोर्नी अधिवक्ता असावा. पात्र उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर याठिकाणी नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश चाचणी (CET) द्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात परंतु योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणा अभावी निश्चित असे ध्येय प्राप्त करु शकत नाहीत. त्यासाठी “सारथी” ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.