Sarathi the progress of the Maratha community
मराठा समाजाच्या प्रगतीची ‘सारथी’!(भाग-2)
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात ‘सारथी’ ही खऱ्या अर्थाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीची सारथी बनली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आदी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी, युवकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. या संस्थेच्या योजनांचा आढावा आपण घेत आहोत.
उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती:
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जुलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती:
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जुलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (सीएसएमएनआरएफ):
सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण विकसित करण्याच्या उद्दिष्टाने ही अधिछात्रवृत्ती देण्यात येत आहे. संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतु कमाल पाच वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह 31 हजार रुपये अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांचा सहभाग आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम(सीएसएमएस-दीप) राबवण्यात येतो. 1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरूवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36 हजार 525 अर्जांपैकी अंतिम छाननीतून सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जांची संख्या 27 हजार 346 इतकी आहे.
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम:
सन 2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2 हजार 500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, कापणीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 मध्ये देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून राज्यातील 26 ठिकाणी प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात येईल.
सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम:
या कार्यक्रमांतर्गत 35 क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले असून विद्यार्थी नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.
विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प/योजना:
यासोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथीमार्फत श्रीमंत मालोजीराजे – सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरातही 3 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत, आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक ‘रेडी टू वर्क’ मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.
अशा विविध पद्धतीने सारथी मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी, आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम, योजना राबवण्यात येत आहे. सर्व घटकांचे कल्याण, सामाजिक न्यायाच्या तत्त्वाचा अंगीकार ही या योजनांची वैशिष्ट्ये होत.
(समाप्त)
– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मराठा समाजाच्या प्रगतीची ‘सारथी’!(भाग-2)”