Veteran Marathi singer and actress Kirti Shiledar pass away.
मराठी रंगभूमीवरच्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचं निधन.
पुणे : मराठी रंगभूमीवरच्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ६९ वर्षांच्या होत्या. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. आज सकाळी त्रास होऊ लागल्यानं त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात आधार देणारे जयमाला आणि जयराम शिलेदार हे त्यांचे आई – वडील. आईवडिलांकडूनच नाट्य संगीताचा वसा घेणाऱ्या कीर्ती यांनी वयाच्या अवघ्या १०व्या १२व्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलं.
नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. नाट्यसंगीतात गायकी बरोबरच अभिनयाचं महत्त्व जाणून नवीन पिढीकरता संगीत रंगभूमीच्या दर्जाचं मानक त्यांनी प्रस्थापित केलं. नाट्यसंगीतातलं शब्दोच्चारांचं महत्व सांगणारं स्वर ताल शब्द संगती हे त्यांनी लिहीलेलं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे.
टपोरे डोळे, बोलका चेहरा आणि भावपूर्ण स्वर गाणारा गोड गळा, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य. स्वयंवर, मानापमान, सौभद्र, एकच प्याला ही गंधर्वयुगातली नाटकं पुनरुज्जीवित करतानाच त्यांनी स्वरसम्राज्ञी, ययाती आणि देवयानी, रंगात रंगला श्रीरंग अशा नवीन नाटकाकारांच्या नाटकातूनही भूमिका केल्या. पिग्मॅलियनवर आधारित स्वरसम्राज्ञी नाटकातली त्यांची मैनाराणीची भूमिका विशेष गाजली. मराठी संगीत रंगभूमीवर त्यांनी इतरही प्रयोग केले. नाट्यसंगीताच्या मैफली देशोदेशी केल्या. त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण गाणं रसिकांच्या पसंतीस उतरलं.
राज्यशासनाचा जीवनगौरव पुरस्कार तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. संगीत नाटक अकादमीत त्यांनी काही काळ महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणूनही काम केलं.२०१८ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं.
त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शिलेदार यांच्या निधनानं नाट्यसृष्टीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मान्यवरांकडून श्रद्धांजली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे.
शिलेदार कुटुंबियांनी संगीत रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांकडे निश्चितच जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
उपमुख्यमंत्री अजित पवार
“ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
सूरांची शिलेदारी जपणारी आणि वाढवणारी महान गायिका हरपली – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख . संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.