महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा पुनर्निर्धार करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन.
मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ.बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ.बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा अनेकांनी आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.