मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टीमचे कौतुक.
ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ कलाकारांना प्रदान
‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्य जत्रा’ची टीम करत आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्त्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्त्व कळते. आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भीती आहे. दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्त्व पटते. यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजित ताम्हणकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सोनी टिव्हीचे अजय भाळवणकर, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्य जत्राच्या टिमधील वनिता खरात, अमित फाळके, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.