IHG should cooperate to make the medical sector in Maharashtra more efficient – Medical Education Minister Amit Deshmukh.
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आयएचजीने सहकार्य करावे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख.
मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्यास राज्य शासनाची प्राधान्यता आहे. आगामी काळात आयएचजी (इंटरनॅशनल हॉस्पिटल्स ग्रुप) यांनी यासाठी पुढे येऊन महाराष्ट्राला सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील बैठक वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
श्री.देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात सर्वसामान्यांना किफायतशीर दरात आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी शासन काम करीत आहे. हे करण्यासाठी येणाऱ्या काळात राज्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालये, चांगल्या वैद्यकीय सेवा-सुविधांचे जाळे विकसित करणे आणि या सेवा सर्वसामान्यांना किफायतशीर दरात उपलब्ध करणे यावर राज्य शासनाचा भर आहे.
भविष्यात महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. यशस्वी आणि दीर्घकालीन वैद्यकीय सुविधा निर्माण करणे, पीपीपी तत्वावर वैद्यकीय यंत्रणा उभारणे यावर भर देण्यात येणार आहे, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील तृतीयक आरोग्य सेवेसाठी (Tertiary Healthcare Services) पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षण सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे रणनीतिक सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत (आयएफसी) करारबद्ध करण्यात आला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) धोरण राज्य शासनाने ठरविले आहे.
आयएचजी कंपनी 1978 पासून आरोग्य क्षेत्रात काम करीत आहेत. तर 55 देशातील 450 हून अधिक आरोग्य प्रकल्पांवर या संस्थेने काम केले आहे. महाराष्ट्रात आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सुलभीकरण करण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत केलेल्या अनुभवाचा फायदा होणार असल्याने आयएचजी यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.