महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची १०५ वी बैठक संपन्न.
कृषी विद्यापीठाने हवामान व पर्यावरण बदल लक्षात घेवून शेतकरी केंद्रीत कार्यपद्धती निश्चित करावी-कृषी मंत्री दादाजी भुसे
कृषी विद्यापीठांनी शेतकरी हिताच्यादृष्टीने एकत्रित समन्वय साधून हवामान व पर्यावरण बदल लक्षात घेत शेतकरी केंद्रीत कार्यपद्धती निश्चित करावी आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चिमा सभागृहात आयोजित महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १०५ व्या बैठकीत ते बोलत होते.
श्री.भुसे म्हणाले, हवामान व पर्यावरण बदल तसेच शेतकरी हित लक्षात घेवून कृषी विद्यापिठाने विभागनिहाय पीक पध्दतीत बदल करावे. जंगली प्राणी आज मोठ्याप्रमाणावर शेती पीकांचे नुकसान करत असून त्यादृष्टीने पीक पध्दतीत बदल आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून संशोधन केले पाहिजे. बदलत्या पर्यावरणाचा विचार करता विद्यापीठस्तरावर अभ्यासक्रमात बदल करणे काळाची गरज आहे.
शेतकरी शेततळ्यात मत्स्यव्यवसाय करीत असून याबाबत कृषी विद्यापीठस्तर शेतकऱ्याना मार्गदर्शन करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे. कृषी विद्यापिठातील विद्यार्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय भेटीचे नियोजन करावे. एखाद्या विद्यापिठाने केलेल्या संशोधन कार्याचा उपयोग इतरही विद्यापिठांनी करावा.
कृषी विद्यापिठातील प्रवेश प्रक्रिया विद्यार्थीहिताच्यादृष्टीने सुरळीतपणे पार पाडावी.
कृषी विद्यालयाचे मूल्याकंन करतांना ठरवून दिलेल्या निकषानुसार करण्यात यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक बाबीचा विचार करुनच पायाभूत सुविधा उभारणीवर भर देण्यात यावा. कृषी विद्यापीठ व संलग्न विद्यालये यांच्या राखीव जागेवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री.भुसे म्हणाले.
कृषी राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, देश तसेच विदेशातील कृषी संशोधन प्रकल्पाचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ करून देण्याबाबत विचार करावा. विद्यापिठ स्तरावर संशोधनात्मक कार्य करतांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. भविष्यकाळातील तापमान वाढीचे गंभीर परिणाम लक्षात घेता पीक पध्दतीत बदल करण्याच्या दृष्टीने संशोधन करावे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री. आबिटकर यांनी कृषी विषयक निर्णय घेतांना त्या वेळेची भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, शासनाच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.
यावेळी शिक्षण व संशोधन संचालक डॉ.हरिहर कौसडीकर यांनी शिक्षण व संशोधन शाखा, विस्तार शिक्षण संचालक डॉ.विठ्ठल शिर्के यांनी विस्तार शिक्षण व साधन सामुग्री विकास शाखा आणि प्रशासन सहसंचालक डॉ.नितीन गोखले यांनी प्रशासन शाखेची माहिती सादरीकरण दिली.