महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना २०२१ च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे ५० वे वार्षिक अधिवेशन संपन्न
मुंबई : महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे. मात्र विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी विज्ञान व उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सन २०२१ च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओद्वारे आभारपर मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ कोल्हापूर व तालसंदे आकुर्डी पुणेचे कुलगुरू डॉ.संजय पाटील, नवी दिल्ली एआयसीटीई या संस्थेचे सदस्य डॉ.देविप्रसाद शर्मा, कोलकाता येथील एनटीटीआर या संस्थेचे संचालक प्रा.राजीव कुमार, कानपूर येथील एचव्हीटीयू विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ.ओमकार सिंग, म्हैसूर येथील व्हीजेटीआर येथील शास्त्रज्ञ डॉ.फारूक काझी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी देशातील उत्कृष्ट कुलगरु तसेच इंजिनीयरींग महाविद्यालयांच्या प्राचार्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्यात संगीत व कला विद्यापीठ :- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले,आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ लोकांना भेटता आले हे मी भाग्य समजतो. अनेक नव्याने तंत्रशिक्षण क्षेत्रातील संस्था उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रही उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. राज्यात जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे कला विद्यापीठ म्हणून येत्या काही महिन्यातच नावारूपास येणार आहे. तसेच राज्यात शासकीय संगीत महाविद्यालय उभे राहत आहे ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तसेच राज्यात राबविण्यात येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा पहिला भागही आगामी मंत्रीमंडळासमोर सादर होणार आहे, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
देशात आदर्शवत नवीन शैक्षणिक धोरण राज्य राबवेल : राज्यमंत्री गृह(शहरे) सतेज पाटील
राज्यमंत्री गृह (शहरे) सतेज पाटील म्हणाले, देशातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली ही संस्था कार्यरत आहे. विशेषतः संस्थेचे अध्यक्ष प्रताप देसाई हे शिक्षणाचा दर्जा जपला जावा यासाठी अत्यंत चांगलं काम करीत आहेत. सरकार बरोबर योग्यपणे समन्वय ठेवून शिक्षण क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. राज्यातही नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात एक आदर्श असे हे नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राबवेल, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी केले. प्रा.महेश काकडे यांनी सूत्रसंचालन तर आभार श्री.कटके यांनी मानले.