Former minister and senior Shiv Sena leader Sudhir Joshi dies
माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन
मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं मुंबईतल्या जसलोक रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत काम करत असलेल्या सुधीर जोशी यांनी शिवसेनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना वाढवण्यासाठी, स्थानिकांच्या हक्कांसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं. स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाची धुराही त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.
१९६८ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक आणि १९७३ मध्ये महापौर झाले. पदवीधर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेलेले सुधीर जोशी पुढे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेही होते. युती सरकारच्या काळात ते महसूल आणि नंतर शिक्षण मंत्री होते.
सुधीर जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले, या शब्दात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. शिवसेना पक्ष संघटनेच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी त्यांनी कायम भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले होते, असं पवार यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्य़ा राजकारणात सुधीर जोशी यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे, या शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
शिवसेनेला जनमानसात पोचवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. मराठी माणसाच्या रोजगाराच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या मार्गदर्शनाची कायमच उणीव भासेल, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली भुमीपुत्रांच्या हक्कासाठी सुधीर जोशी यांनी कायम संघर्ष केला, या शब्दात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
कामगार आणि ग्राहक चळवळीत सुधीर जोशी यांनी दिलेलं योगदान अतिशय मोलाचं होतं. ते कायम स्मरणात राहतील, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक संदेशात सांगितलं आहे.