माणसाच्या अंर्तबाह्य विकासासाठी ग्रंथसंपदा गरजेची – डॉ. सदानंद मोरे.
पुणे:- ग्रंथसंपदा माणसाची वैचारिक भूक भागवते आणि त्यातूनच अंर्तबाह्य विकास होतो, मात्र चांगले-वाईट यातला फरक समजून घेता आला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. मोरे पुढे म्हणाले की, वाचनाची भूक शमवण्यासाठी अशी असंख्य प्रदर्शने भरवली गेली पाहिजेत. आजच्या ऑनलाईन वाचनाच्या जमान्यात आपण काय पाहतो, काय वाचतो, याचे भान ठेवता आले पाहिजे. पुस्तके हीच आपली मार्गदर्शक आहेत, मात्र वाचनातील सत्य-असत्याची पडताळणी जागरुकतेने करता आली पाहिजे, जे सत्य आहे तेच समाज स्विकारतो हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. मोरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव सुधीर वैशंपायन, विश्वस्त राहुल सोलापूरकर, श्रीनिवास कुलकर्णी, पं. वसंतराव गाडगीळ व डायमंड पब्लिकेशन्सचे दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. ढेरे म्हणाल्या की, भांडारकर संस्थेने अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरु आहे. वाचक आणि प्रकाशक, लेखक यांना जोडणारे हे व्यासपीठ आहे. आमदार शिरोळे म्हणाले की, भांडारकर संस्थेमध्ये सर्व नागरिकांना यावे असा हा लोकाभिमूख उपक्रम आहे. पुस्तकेच आपली खरी मार्गदर्शक आहेत. प्रास्ताविक भूपाल पटवर्धन यांनी केले तर नगरसेविका माधुरी सहस्रबुध्दे यांनी आभार मानले.
विविध विषयावरील सुमारे 10 हजार पुस्तके या प्रदर्शनात आहेत तर भांडारकर संस्थेची विविध 300 पुस्तके देखील विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामध्ये हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र (5 खंड), महाभारताची चिकित्सक आवृत्ती (19 खंड) आणि वेदिक बिबिलोग्राफी ही दुर्मिळ ग्रंथसंपदा असून याबरोबरच योग पतंजली, पर्युषण कल्पसुत्र, बुधभूषण, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती, पतंजली व्याकरण अशा विविध 14 ग्रंथांचे पुनर्मुद्रण केलेले ग्रंथ देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजपासून 19 डिसेंबर पर्यंत असे 10 दिवस हे प्रदर्शन भांडारकर संस्थेत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार असून सर्वांना मोफत प्रवेश आहे.