मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड.

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

कोविड प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य.Minister of School Education Prof. Varsha Eknath Gaikwad.

मुंबई : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. याअनुषंगाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. आता १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाला असल्याने सर्व शाळांनी नियोजन करून या वयोगटातील विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे. जेथे अद्यापही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नसेल तेथे त्यांनीही तातडीने लस घ्यावी. शाळांमध्ये कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून गर्दीचे उपक्रम टाळावेत. शाळेमध्ये गर्दी टाळण्यासाठी ५० – ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवावी. प्रात्यक्षिके गर्दी टाळून घ्यावीत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन, लसीकरण आदींबाबत दक्षता घ्यावी. विद्यार्थी अथवा शिक्षक/ कर्मचारी कोविड संक्रमित झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन वर्ग अथवा शाळा गरजेनुसार बंद ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच लसीकरण होत असल्याने शाळांनी गर्दी टाळून योग्य नियोजन करावे. विद्यार्थी अथवा शिक्षक कोविड संक्रमित झाल्यास ती वर्गखोली सॅनिटाईज करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. बहुतांश जिल्ह्यांत १५ ते २० तारखेपर्यंत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभाग दक्ष आहे. राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ लाख २३ हजार ९११ इतकी असून सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदी ऑनलाईन उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *