मुंबईच्या नौदल गोदीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश.
अत्याधुनिक शस्त्रे आणि आधुनिक टेहळणी रडारसह सेन्सर्स असलेली स्वदेशी क्षेपणास्त्र नाशक विनाशिका
ही विनाशिका भारताच्या वाढत्या सागरी शौर्याचे प्रतीक- संरक्षण मंत्री
संरक्षण मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- आयएनएस विशाखापट्टणम सागरी सुरक्षा बळकट करेल आणि राष्ट्रहिताचे संरक्षण करेल
- ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने मोठी झेप
- सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे भारत लवकरच जागतिक जहाजबांधणी केंद्र बनणार
- हिंद -प्रशांत क्षेत्र खुले, निर्धोक आणि सुरक्षित ठेवणे भारतीय नौदलाचे मुख्य उद्दिष्ट
- सर्व सहभागी देशांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने आपली नियम-आधारित हिंद -प्रशांत क्षेत्राची कल्पना
- स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी नियम-आधारित नौकानयन स्वातंत्र्य आणि सागरी मार्गांची सुरक्षा आवश्यक
मुंबईतील नौदल गोदीत 21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम या पी15बी स्टेल्थ गायडेड मिसाईल विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. विशाखापट्टणम श्रेणीच्या चारपैकी भारतीय नौदलाच्या स्वतःच्या जहाज रचना संचालनालयाने संपूर्णपणे भारतात रचना केलेल्या आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबईकडून बांधणी केलेल्या पहिल्या विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे.
आयएनएस विशाखापट्टणम ही देशाच्या वाढत्या सागरी शौर्याचे प्रतीक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे संरक्षण मंत्री या समारंभात बोलताना म्हणाले. त्यांनी सांगितले की, ही विनाशिका प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या सागरी सामर्थ्याचे, जहाज बांधणी कौशल्याचे आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारी आहे.अत्याधुनिक यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी ही अत्याधुनिक विनाशिका सागरी सुरक्षा बळकट करेल आणि राष्ट्रहिताचे रक्षण करेल असा विश्वास श्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.सशस्त्र दल आणि संपूर्ण देशाच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करू शकणारी जगातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गायडेड क्षेपणास्त्र युद्धनौकांपैकी एक ही युद्धनौका आहे ,असे त्यांनी या विनाशिकेचे वर्णन केले.
नौदलाने 41 पैकी 39 जहाजे आणि पाणबुड्यांची भारतीय जहाजबांधणी कंपन्यांकडे नोंदवलेली मागणी हा ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची साक्ष असून आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नौदल करत असलेल्या प्रयत्नांची श्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली.
‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या नौदलाच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा असलेली स्वदेशी विकसित विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’चे उदाहरण त्यांनी दिले. “ही युद्धनौका हिंद महासागरापासून प्रशांत आणि अटलांटिक महासागरापर्यंत आपली पोहोच वाढवेल.ही युद्धनौका कार्यान्वित होणे हा भारतीय संरक्षण इतिहासातील एक सुवर्ण क्षण असेल.भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन आणि 1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाचा 50 वा वर्धापन दिन साजरा करण्याचा हा सर्वोत्तम प्रसंग असेल,”असे ते म्हणाले.
उद्योगांच्या विविध जनसंपर्क कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ‘फ्लोट’, ‘मूव्ह’ आणि ‘फाइट’ श्रेणी अंतर्गत स्वदेशी सामग्रीत वाढ करण्यासाठी भारतीय नौदल करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली. प्रयत्नांची ही गती गती कायम ठेवण्याच्या गरजेवर भर देत,त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “सरकारने उचललेली पावले आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना चालना देत राहतील.आणि आपण लवकरच केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी जहाजे तयार करू.” या दृष्टीकोनाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सरकारच्या सातत्यपूर्ण सहकार्याची ग्वाही त्यांनी दिली.
जागतिक सुरक्षेसंदर्भात उद्भवलेली कारणे, सीमा वाद आणि सागरी वर्चस्व यांनी देशांना त्यांचे संरक्षण सामर्थ्य बळकट करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडले आहे, असे सांगत श्री राजनाथ सिंह यांनी आवाहन केले की, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने सरकारच्या धोरणांचा लाभ घेऊन, एकत्रितपणे काम करून भारताला स्वदेशी जहाज बांधणीचे केंद्र बनवावे. त्यांनी सरकारने केलेल्या अनेक सुधारणांची यादी सादर केली ,या सुधारणांद्वारे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवू शकतात, असे ते म्हणाले. सरकारने केलेल्या सुधारणांमध्ये परवाना प्रक्रिया सुलभ करणे ; आवश्यकतेची स्वीकृती (एओएन ) आणि प्रस्तावाची विनंती (आरएफपी ) प्रक्रिया वेगवान करणे; उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण औद्योगिक मार्गिकेची स्थापना; 200 हून अधिक स्वदेशी वस्तूंच्या निश्चित केलीली सूची; देशांतर्गत कंपन्यांकडून खरेदीसाठी ,संरक्षण संपादन प्रक्रिया 2020 आणि 2021-22 च्या भांडवली संपादन खर्चाअंतर्गत आधुनिकीकरण निधीपैकी सुमारे 64 टक्के निधी राखून ठेवणे याचा समावेश आहे.
हिंद – प्रशांत क्षेत्र खुले , निर्धोक आणि सुरक्षित ठेवणे हे भारतीय नौदलाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. भारताचे हितसंबंध थेट हिंद महासागराशी संलग्न आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने हा प्रदेश महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.“समुद्री चाचेगिरी, दहशतवाद, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची अवैध तस्करी, मानवी तस्करी, बेकायदेशीर मासेमारी आणि पर्यावरणाची हानी यांसारखी आव्हाने सागरी क्षेत्रावर परिणाम करण्यासाठी तितकीच जबाबदार आहेत.त्यामुळे संपूर्ण हिंद -प्रशांत क्षेत्रात भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते,”असे ते म्हणाले. जागतिकीकरणाच्या सध्याच्या युगात जागतिक स्थैर्य , आर्थिक प्रगती आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी नियम-आधारित नौकानयन स्वातंत्र्य आणि सागरी मार्गांच्या सुरक्षिततेचे महत्त्व संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले.
भारत एक जबाबदार सागरी हितसंबंधीत म्हणून, सहमती-आधारित तत्त्वांचा आणि शांततापूर्ण, मुक्त, नियम-आधारित आणि स्थैर्य असलेल्या सागरी व्यवस्थेचा समर्थक आहे, याचा पुनरुच्चार श्री राजनाथ सिंह यांनी केला. 1982 च्या ‘सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन’ (यूएनसीएलओएस )
मध्ये,देशांचे प्रादेशिक पाणी, अनन्य आर्थिक क्षेत्र आणि ‘सागरी सुव्यवस्था’ हे तत्त्व मांडण्यात आले आहे.काही बेजबाबदार देश आपल्या संकुचित पक्षपाती हितसंबंधांसाठी वर्चस्ववादी वृत्तीतून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे नवनवीन आणि अयोग्य अर्थ लावत आहेत.हे देश नियम-आधारित सागरी आदेशाच्या मार्गातील अडथळे बनून मनमानी पद्धतीने अन्वयार्थ लावतात. नौकानयन स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि सार्वत्रिक मूल्ये असलेल्या आणि सर्व सहभागी देशांचे हित जपले जपणाऱ्या एका नियम-आधारित हिंद – प्रशांत क्षेत्राची आपण संकल्पना मांडतो ” असे ते म्हणाले.
शेजारील देशांसोबत मैत्री, मोकळेपणा, संवाद आणि सहअस्तित्व या भावनेने.’सागर’ (प्रदेशातली सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास) हा पंतप्रधानांचा दृष्टीकोन पुढे नेल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले.
7400 टन वजनाची ही अतिशय दिमाखदार विनाशिका 163 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद आहे आणि भारतात बांधणी करण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि विशेष क्षमता असलेल्या युद्धनौकांपैकी एक म्हणता येईल. कंबाईन्ड गॅस आणि गॅस प्रॉपल्शन प्रणालीचे मिश्रण असलेल्या चार अतिशय ताकदवान टर्बाईन्सवर अतिशय वेगाने पाणी कापत पुढे जाणारी ही युद्धनौका असून ती 30 नॉटपेक्षा (ताशी 30 सागरी मैल किंवा 54 किमी) जास्त वेग प्राप्त करू शकते.
ही विनाशिका स्टेल्थ म्हणजे रडारला चकवा देणारी असल्याने तिच्या संपूर्ण सांगाड्याचा आकार आणि त्यावरील आवरण रडारला चकवा देण्याच्या वैशिष्ट्यांसह कमीत कमी काटछेदासह बनवण्यात आले आहे. फुल बीम सुपरस्ट्रक्चर डिझाईन, प्लेटेड मास्ट आणि खुल्या डेकवर रडार लहरींना परतू न देणाऱ्या सामग्रीचा वापर अशा वैशिष्ट्यांमुळे रडारला चकवा देण्याची क्षमता या विनाशिकेत आहे.
अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सनी ही विनाशिका सुसज्ज आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम आणि लघु पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट्स, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा यात समावेश आहे. मारा करणाऱ्या तोफा आणि इतर प्रणालीला लक्ष्याची तपशीलवार माहिती देणारे अत्याधुनिक टेहळणी रडार यावर बसवण्यात आले आहे. या विनाशिकेची पाणबुडीविरोधी क्षमता बळकट करण्यासाठी स्वदेशी बनावटीची रॉकेट लॉन्चर्स, टॉर्पेडो लॉन्चर्स आणि एएसडब्लू हेलिकॉप्टर्स आहेत. आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांना तोंड देण्याची या विनाशिकेमध्ये क्षमता आहे. या विनाशिकेच्या बांधणीत स्वदेशी बनावटीच्या सुमारे 75% सामग्रीचा समावेश असल्याने आत्मनिर्भर भारतमध्ये तिचे मोलाचे योगदान आहे. युद्ध व्यवस्थापन प्रणाली, रॉकेट लॉन्चर, टॉर्पेडो ट्युब लॉन्चर, इंटेग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम, स्वयंचलित उर्जा व्यवस्थापन प्रणाली, फोल्डेबल हँगर डोअर, हेलो ट्रॅव्हर्सिंग प्रणाली, क्लोज इन वेपन सिस्टम आणि बो माऊंटेड सोनार यांसारख्या स्वदेशी बनावटीच्या प्रणालींचा यात समावेश आहे.
पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातील ऐतिहासिक शहर असलेल्या विशाखापट्टणमच्या नावावरून या विनाशिकेचे नाव ठेवण्यात आले आहे. या विनाशिकेवर 315 कर्मचारी, त्यांच्या आरामदायी निवासाच्या सोयीसह तैनात करण्याची व्यवस्था आहे. दिशादर्शन आणि निर्देश तज्ञ असलेले कॅप्टन बीरेंद्र सिंह बैन्स यांच्याकडे या विनाशिकेची धुरा सोपवण्यात आली आहे.
हिंदी महासागर क्षेत्रातील बदलत राहणाऱ्या सामर्थ्याच्या स्वरुपानुसार भारतीय नौदलाची त्वरेने हालचाल करण्याची क्षमता, पल्ला आणि आपली कामगिरी आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची लवचिकता यामध्ये आयएनएस विशाखापट्टणमच्या आगमनामुळे वाढ होणार आहे.
नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग, खासदार अरविंद सावंत,ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस ॲडमिरल आर हरी कुमार,माझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ॲडमिरल नारायण प्रसाद (निवृत्त), आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी आयएनएस विशाखापट्टणम विनाशिका नौदलात समावेश करण्याच्या समारंभाला उपस्थित होते.