मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

Mumbai Coastal Road Project Accelerates the lives of Mumbaikars – Chief Minister Uddhav Thackeray.

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

• मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण.

मुंबई :- मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱया या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे, ही त्याची पोचपावतीच आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱया वाहतुकीसाठी वापरात येणाऱया पहिल्या बोगद्याचे खणन आज (दिनांक १० जानेवारी २०२२) पूर्ण झाले. त्याप्रसंगी आयोजित ‘ऑनलाईन’ समारंभात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे संबोधित करताना म्हणाले की, मावळा नावाचे बोगदा खणन करणारे संयंत्र त्याच्या नावाला साजेसे काम करीत असून त्याच शिस्तीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील या प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. नैसर्गिक वादळांसह कोविड संसर्गाचे संकट व त्यामुळे उद्भवलेली टाळेबंदी सारखी परिस्थिती यांना खंबीरपणे सामोरे जावून अविरतपणे प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे.

मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याचे खणन आज पूर्ण झाले असून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे काम आत्यंतिक कठिण स्वरुपाचे असून ते यशस्वीरित्या वर्षभराच्या आत पार पाडणे, ही विक्रमी स्वरुपाची कामगिरी आहे.

तत्पूर्वी, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आले. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला. दरम्यान, कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता, हा कार्यक्रम पूर्णपणे दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती स्मिता गवाणकर यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *