An annual ‘World Theater Festival’ should be held in Mumbai
मुंबई येथे वार्षिक ‘जागतिक रंगभूमी महोत्सव’ व्हावा – राज्यपाल रमेश बैस
दशावतार, नौटंकी, यक्षगान यांसह सर्व नाट्य परंपरा जगापुढे आणाव्यात
‘भारत रंग महोत्सव २०२४’ चे उद्घाटन
मुंबई : भारताला रंगभूमीचा मोठा इतिहास लाभला आहे. प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र रंगभूमी आहे. तमाशा, यक्षगान, नौटंकी, जत्रा, दशावतार यांसारख्या अनेक परंपरा देशात आहेत. या सर्व नाट्य परंपरा जगापुढे आणण्याची गरज आहे असे सांगताना न्यूयॉर्क मधील ‘मेट गाला’ फॅशन महोत्सवाप्रमाणे मुंबईत जागतिक रंगभूमीचा वार्षिक महोत्सव व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केली.
राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे आयोजित २५ व्या भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन एनसीपीए, मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
उद्घाटन सत्राला राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष अभिनेते परेश रावल, ‘भारंगम’ महोत्सवाचे ब्रँड ऍम्बॅसेडर पंकज त्रिपाठी, अभिनेते रघुवीर यादव, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी आदी उपस्थित होते.
रंगभूमी सर्वसमावेशक असावी. समाजाच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत रंगभूमीने पोहोचावे. लोकांचे दुःख आपण दूर करू शकत नाही. परंतु काही तासांकरिता तरी लोकांना मनोरंजनाच्या माध्यमातून दुःख विसरायला लावण्याची शक्ती कलाकारांकडे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
आपण चाळीस वर्षे राजकीय मंचावर वावरत आहोत. परंतु, रंगकर्मींच्या मंचावर प्रथमच आलो असे सांगून राज्यातील व शहरातील नाट्यगृहे सुस्थितीत ठेवण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
नाट्यगृहाचे भाडे परवडणारे ठेवल्यास लोकांना नाटकांची तिकिटे कमी किमतीत मिळू शकतील, असे त्यांनी सांगितले. रंगभूमी ही लोकचळवळ झाली पाहिजे व सर्व प्रादेशिक भाषा व बोलींमधून रंगभूमीला चालना दिली गेली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
निवृत्त कलाकार व तंत्रज्ञ यांना दिली जाणारी पेन्शन वाढवली पाहिजे तसेच त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च देखील केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
प्रत्येक राज्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय असावे : परेश रावल
मुंबई ही रंगभूमीची राजधानी आहे. येथे दररोज मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कोकणी नाटके होतात. परंतू राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे केंद्र दिल्लीत आहे, मुंबईत नाही, याकडे लक्ष वेधून ‘एम्स’ प्रमाणे प्रत्येक राज्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय असावे व त्यासोबत कमी भाडे आकारणारे नाट्यगृह देखील असावे असे विद्यालयाचे अध्यक्ष श्री. रावल यांनी सांगितले.
रंगभूमीचे ओटीटी प्रमाणे स्वतःचे हक्काचे व्यासपीठ असावे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने आत्मनिर्भर बनावे व प्रत्येक विद्यापीठासोबत काम करावे, त्यातून अनेक कलाकार निर्माण होतील असे त्यांनी सांगितले.
आपण जबलपूर जवळील एका लहान गावातून आलो. तेथील पापड विक्रेता, चणा विक्रेता आदी लोकांच्या लकबी शिकत येथवर आलो, असे श्री. यादव यांनी सांगितले.
बिहारमध्ये रंगकर्मीला ‘रंगबाज’ म्हणतात असे सांगून रंगभूमीशी नवनवे प्रेक्षक जोडले पाहिजे, असे श्री. त्रिपाठी यांनी सांगितले.
भारतीय रंग महोत्सव गेल्या २५ वर्षांपासून सुरु असून आज तो जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव झाला आहे, असे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक श्री. त्रिपाठी यांनी सांगितले.
एकूण २२ दिवस १५ शहरांमध्ये चालणाऱ्या या नाट्य महोत्सवात १५० नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या ‘भारंगम’ महोत्सव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मुंबई येथे वार्षिक ‘जागतिक रंगभूमी महोत्सव’ व्हावा”