Congratulations to Padma Award recipients from Chief Minister Uddhav Thackeray.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पद्म पुरस्कार सन्मानार्थींचे अभिनंदन.
मुंबई :- ‘भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे सन्मानार्थी हे समृद्ध महाराष्ट्राचे वैभव आहेत. त्यांच्या पुरस्कारांनी महाराष्ट्राच्या गौरवात भरच पडली आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्म पुरस्कार सन्मार्थींचे अभिनंदन केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच डॉ. हिम्मतराव बावस्कर, ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार डोंगरे, गायक सोनू निगम, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, संशोधक अनिलकुमार राजवंशी, ज्येष्ठ न्युरोलॉजीस्ट डॉ. भिमसेन सिंगल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना पद्मश्री तर भारताच्या तिन्ही सेनादलाचे पहिले संयुक्त प्रमुख जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. या दोघांचे त्या त्या क्षेत्रातील योगदान अमूल्य असे आहे, हे पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाविषयीची कृतज्ञताच आहे, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत,आणि या दोघांनाही अभिवादन केले आहे.