मॉईलने मॅगनीज उत्पादनामध्ये वाढ करुन निर्यात केली पाहिजे .

Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari

मॉईलने मॅगनीज उत्पादनामध्ये वाढ करुन निर्यात केली पाहिजे भारताला आत्मनिर्भर बनवले पाहिजे – नितिन गडकरी.

केंद्रीय स्टील मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांची मॉईलच्या कर्मचाऱ्यांना उत्पादन आधारित बोनस म्हणून 28 हजार रुपये दिवाळीच्या अगोदर देण्याची घोषणा; वेतन  सुधारणेला देखील  मान्यता.

मॉईलच्या  व्हर्टिकल शाफ्ट, खाणींच्या  रुग्णालयांचे उद्घाटन  तिरोडी खाणीतील प्रशासकीय इमारत आणि बालाघाट खाणीतील जीटी वसतिगृहचे  लोकार्पण संपन्न.

मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड- मॉईलने मॅगनीज उत्पादनामध्ये वाढ करुन  त्याची निर्यात केली पाहिजे आणि भारताला आत्मनिर्भर बनवले पाहिजे. यासाठी एकत्रित वृत्तीने  कामगार संघटना तसेच मॉईल कंपनी यांनी काम करावे असे आवाहन केंद्रीय  रस्ते वाहतूक,  महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले. Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari

स्थानिक हॉटेल ली-मेरिडियन येथे केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या  मॉईलच्या वतीने चिकला खाण येथे दुस-या  व्हर्टिकल शाफ्टचे लोकार्पण, चिकला, गुमगाव, डोंगरीबुजुर्ग, तिरोडी आणि कांद्री या पाच खाणींच्या ठिकाणी  रुग्णालयांचे उद्घाटन तसेच तिरोडी खाणीतील प्रशासकीय इमारत आणि बालाघाट खाणीतील जीटी (ग्रेज्युएट ट्रेनी) वसतिगृहाचे  लोकार्पण  त्यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी केंद्रीय स्टील मंत्री  रामचंद्र प्रसाद सिंह,  राज्याचे पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, मॉईलचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक  मुकुंद पी. चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमात केंद्रीय स्टील मंत्र्यांनी मॉईलच्या कर्मचाऱ्यांना उत्पादन आधारित बोनस म्हणून 28 हजार रुपये दिवाळीच्या अगोदर देण्याची घोषणा केली तसेच 1 ऑगस्ट 2017 पासून ते पुढील दहा वर्षाकरिता म्हणजेच 31 जुलै 2027 पर्यंत वेतन सुधारणेला देखील  मान्यता दिली  यामूळे   कंपनीच्या 5800  कर्मचा-यांना तसेच कामगारांना लाभ मिळणार आहे.   केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्मचारी संघटनांच्या या 20  वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या केंद्रीय स्टील मंत्री आर. पी. सिंह  यांनी विशेषरित्या मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.  तसेच या मागण्या मान्य केल्यानंतर आता कर्मचारी संघटनांनी 14 लक्ष  मेट्रिक टन स्टीलचे वार्षिक उत्पादन वाढवावे असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.  कर्मचारी संघटनांच्या समस्या  व मागण्या बद्दल आपल्याला पूर्ण कल्पना आहे. कंपन्यांच्या मानव संसाधन विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशील असायला हवे  असेही गडकरी यांनी सांगितलं. फायनान्शिअल ऑडिट पेक्षा परफॉर्मन्स ऑडिट हे महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांनी कामगारांना एकत्रित येत जोमाने काम करावे  असे आवाहन केले.  ऑटोमोबाइल इंडस्ट्री,  इथेनॉल या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रीन हायड्रोजनची आवश्यकता आहे. स्टील उद्योगांमध्ये सुद्धा कोकिंग कोलच्या ऐवजी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याची ही वेळ आहे असेही त्यांनी  नमुद  केले.

केंद्रीय  स्टील मंत्री आर. पी. सिंह यांनी राष्ट्रीय स्टील पॉलिसी 2017  नुसार स्टीलचे 300  मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असून  ते साध्य करण्यासाठी मॉईलच्या खाणीचे व्यवस्थापन, पर्यावरण विषयक परवानग्या, यासंदर्भात आराखडा आवश्यक आहे. कामगाराचे मनोबल वाढण्याच्या  दृष्टीने मानव संसाधन विभागाच्या धोरणात सुद्धा बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.   भारतात  72 हजार कोटी रुपयाच्या कोकींग कोलची आयात होत असून याला पर्याय म्हणून हायड्रोजनसारख्या हरित उर्जेची  आवश्यकता आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

राज्याचे  पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मॉईलच्या मानव संसाधन विभागाने कर्मचारी तसेच कामगारांच्या समस्यासंदर्भात संवेदनशील दृष्टिकोन ठेऊन त्यांना सर्वोतपरी मदत करावी   असे  सांगितलं. नागपूरच्या  गुमगाव येथील वर्टीकल शाफ्टचे काम थांबले आहे ते  मार्गी लावण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली तसेच या सर्व कामांसाठी राज्य सरकार मॉईलला आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले . याप्रसंगी  मॉईलचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक  मुकुंद पी. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तीरोडी  येथील ओपनकास्ट  माईन मध्ये 1 कोटी 80 रुपयांचा तरतुदीने सुसज्ज अशा प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. 14 लक्ष मेट्रिक टन  स्टीलचे  उत्पादन या वर्षी  मॉईल पूर्ण करेल असे  असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला  मॉईल कर्मचारी , कामगार  संघटनेचे प्रतिनिधी,   मॉईलचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *