येत्या दोन महिन्यात सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये MRI सुविधा प्रत्यक्षात सुरु – राजेश टोपे.
मुंबई: राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात प्रत्यक्षात सुरु केली जाईल, अशी घोषणा आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केली.
मूलभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा आणि रिक्त जागांची भर्ती याबाबत आरोग्य विभाग प्राधान्यक्रमानं कार्यवाही करत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या आरोग्य सेवेसंबंधी काँग्रेसचे डॉ.सुधीर तांबे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर टोपे उत्तर देत होते.राज्यातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शंभर जागा भरल्या आहेत, आरोग्य विभागातल्या १०० टक्के रिक्त जागा पारदर्शक पद्धतीनं भरल्या जातील, महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कर्करोग उपचार केंद्र सुरु करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची सूचना, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षानं आज सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सादर केली.आज विधानपरिषदेत अकोला महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारी लक्षवेधी सूचना, शिवसेनेचे गोपिकीशन बाजोरिया यांनी मांडली होती, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या लक्षवेधीवर चर्चा होणं म्हणजे न्यायालयाचा अवमान करणं आहे, त्यामुळे विधानपरिषदेच्या नियमाप्रमाणे ही लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लिखित स्वरूपात सभापतींकडे केली होती.
मात्र आज उपसभापतींनी ही लक्षवेधी सूचना चर्चेला घेतल्यामुळे उपसभापती नीलम गोर्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्यानं त्यांना उपसभापती पदावरून दूर करावे अशी मागणी या अविश्वास प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे.