येत्या 8 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या मार्गांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार.
या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला ‘पालखी’साठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार.
पंढरपूरशी संपर्क वाढविण्यासाठी बांधण्यात येणारे अनेक रस्ते प्रकल्पही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 8 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या (NH-965G), तीन विभागांचे भूमिपूजन करणार आहेत.हे प्रकल्प पंढरपूरला भाविकांची ये-जा करणे सुलभ व्हावे यासाठी सुरू करण्यात येत आहेत.या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला ‘पालखी’ साठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्यामुळे भाविकांना विनाअडथळा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध होईल.
दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पाटस ते तोंडाळे-बोंडाळे असा सुमारे 130 किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, या मार्गांचे चौपदरीकरण करून त्यांच्या दोन्ही बाजूंना पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्याचा प्रस्तावित खर्च अनुक्रमे सुमारे 6690 कोटी रुपये आणि सुमारे 4400 कोटी रुपये इतका आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पंढरपूरचा विविध ठिकाणांहून संपर्क वाढविण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील 223 किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित करतील, ज्याची अंदाजे किंमत 1180कोटी रु. पेक्षा जास्त आहे. या प्रकल्पांमध्ये म्हसवड – पिलीव – पंढरपूर (NH 548E), कुर्डुवाडी – पंढरपूर (NH 965C), पंढरपूर – सांगोला (NH 965C), NH 561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि NH 561A चा पंढरपूर – मंगळवेढा – NH 5-A या रस्त्यांचा समावेश आहे.
या समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.