रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा.
मुंबई. : रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या रक्तदान महायज्ञ रॅलीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे स्वागत केले व रॅलीला पुढील प्रवासासाठी झेंडा दाखवून रवाना केले.
नागपूर येथील देवता लाईफ फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित राज्यव्यापी रॅलीच्या सदस्यांनी फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्तदान महायज्ञ रॅलीची माहिती दिली.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त निलिमा बावणे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री, विवेक जुगादे, संजय पेंडसे, सारिका पेंडसे, छायाचित्रकार शेखर सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी या संपूर्ण रॅलीच्या पार्श्वभूमीची माहिती राज्यपालांसमोर सादर केली. किशोर बावणे व संस्थेच्या विश्वस्त नीलिमा बावणे यांनी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यपालांचा सत्कार केला.
आज समाजात सेवाभावाने कार्य करणाऱ्या लोकांची कमी आहे. अनेकदा लोक प्रसिद्धीसाठी काम करतात. परंतु पद व पैसा या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. त्याउलट अंतःकरणातून मिळालेले आशीर्वाद स्थायी असतात. त्यामुळे समाजातील पीडित, दुःखी, अपंग व आजारी लोकांना देव मानून त्यांची सेवा केली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.
राज्यव्यापी रॅलीमुळे राज्यभ्रमणही होईल व सोबत रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होईल असे सांगताना संस्थेने वर्षानुवर्षे काम करीत रहावे व रक्तदानाचे कार्य चिरंजीवी व्हावे या शब्दात राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.
करोना काळात लोक रक्तदान कमी झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा पडला होता. लोकांच्या मनात रक्तदानाबाबत भीती निर्माण झाली होती. रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून 12 जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 15 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती केली जाईल तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवता लाइफ फाउंडेशनच्या उपाध्यक्ष कस्तुरी बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवता लाइफ फाउंडेशनचे सल्लागार विवेक जुगादे यांनी केले.