रांजणगाव महागणपती देवस्थानचा सर्वंकष पर्यटन विकास आराखडा करावा : विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे.
पुणे : अष्टविनायक रांजणगाव गणपती देवस्थानच्या विकासासाठी महत्वपूर्ण कामांचा समावेश असलेला पर्यटन विकास आराखडा पर्यटन विभागाकडे सादर करावा असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.
काल (सोमवार) सायंकाळी उशीरा त्यांनी महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थान परिसर विकासाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.वाय. पाटील, शाखा अभियंता एस. पी. महाजन, राजगुरूनगर बँकेच्या संचालिका विजया शिंदे, देवस्थानचे विश्वस्त ॲड. विजयराज दरेकर आदी उपस्थित होते.
रांजणगाव व देवस्थानमधील पिण्याच्या पाण्याची सुविधेची माहिती घेऊन डॉ.गोऱ्हे यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना द्यावयाच्या सोयी सुविधेबाबत चर्चा केली. मंदिर व दर्शनमार्गावर सौरउर्जेवरील प्रकाशव्यवस्था कशी करता येईल याची माहितीदेखील त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. देवस्थानकडून करण्यात येत असलेल्या विविध सामाजिक व धार्मिक कामांची माहिती यावेळी देण्यात आली.