राजकारणातील महिलांसाठी ‘शी इज अ चेंजमेकर’ हा देशव्यापी क्षमता बांधणी कार्यक्रम राष्ट्रीय महिला आयोगाने केला सुरु.
तळागाळातील महिला राजकीय नेत्यांचे नेतृत्व कौशल्य सुधारण्यासाठी, ग्रामपंचायत ते संसद सदस्य आणि राष्ट्रीय/राज्य स्तरावरील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय कार्यकर्त्यां या सर्व स्तरावरील महिला प्रतिनिधींसाठी, राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू ) आज ‘शी इज अ चेंजमेकर’ या देशव्यापी क्षमता बांधणी कार्यक्रमाची सुरुवात केली.
महिला राजकीय नेत्यांची क्षमता बांधणी आणि वक्तृत्व, लेखन इत्यादीसह त्यांचे निर्णय आणि संवाद कौशल्य सुधारणे या उद्देशाने क्षमता बांधणी कार्यक्रम प्रदेशनिहाय प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने हाती घेतला जाईल.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ठाणे, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ‘शी इज अ चेंजमेकर’ या मालिकेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांचा अधिकृत शुभारंभ आज झाला.राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत ‘महानगरपालिकेतील महिलांसाठी’ तीन दिवसीय क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना श्रीमती शर्मा म्हणाल्या, राजकारणात महिलांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज आहे आणि आयोग त्यांना संसदेपर्यंतच्या प्रवासात मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
“राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीला या कार्यक्रमाचा फायदा होईल आणि राजकारणात तिला हक्काची योग्य जागा मिळवण्यास मदत होईल, असा आमचा विश्वास आहे. मला आशा आहे की ‘शी इज अ चेंजमेकर’ हा प्रकल्प समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करणाऱ्या महिलांच्या जीवनात एक नवीन सुरुवात करेल,” असे श्रीमती शर्मा यांनी सांगितले.