राजकारणातील हिमालय शरदचंद्रजी पवारसाहेब.
सर्वमान्य लोकनेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब यांचा उत्साह ८१व्या वर्षीदेखील तरुणाला लाजवेल असा आहे. भारतातील अनेक लोकनेत्यापैकी आगळेवेगळे नेतृत्व आहे. पवारसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल लिहिण्यासाठी समुद्राची शाई आणि पृथ्वीचा कागदही कमी पडेल.
साहेबांची आई शारदाबाई पवार या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. त्यामुळे त्यांना राजकीय वारसा आईकडून मिळाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पण खरं सांगायचं झालं तर पवार साहेबांची राजकीय कारकीर्द शालेय जीवनापासून सुरु झाली. १९५६ साली गोवा मुक्ती संग्रामाला पाठींबा देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. महाविद्यालयांत असताना ते विद्यार्थी संघटनेचे नेते होते. महाविद्यालयातील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणामुळे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण प्रभावित झाले होते. त्यांच्या सांगण्यावरून पवार साहेबांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वयाच्या २४व्या वर्षी ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
पवारसाहेबांना १९६६ साली युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली, त्यावेळी त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.
१९६७ साली बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभेत गेले. नंतरची राजकीय वाटचाल सर्वाना माहित आहे.
आजच्या युवापिढीला जर राजकारणात यायचं असेल तर त्यांना पवार साहेबांकडून शिकण्यासारखं काय असेल तर, त्यांच्याकडे असलेली तरुणाला लाजवेल अशी प्रचंड ऊर्जा’,प्रबळ इच्छाशक्ती, अचंबित करणारी स्मरणशक्ती , वेळेचे उत्कृष्ट नियोजन, महत्वाकांक्षा ,अविरत, श्रम, सतत काळासोबत राहण्याची वृत्ती.
साहेबांविषयी एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, ती म्हणजे त्यांची स्मरणशक्ती, एखाद्या कार्यकर्त्याला साहेब एकदा भेटले तर ते त्याच नाव साहेबांच्या कायम लक्षात राहतं. पुढे जर तो कार्यकर्ता जरी १० वर्षानंतर भेटला तरी साहेब त्याला नावानिशी ओळखतात.
राजकीय, सहकार, शैक्षणिक, विज्ञान, सामाजिक, आर्थिक, संस्कृती या विषयांचा अभ्यास याच बरोबर साहित्य कला, संगीत याची साहेबांना आवड आहे.
आजच्या घडीला लोकमानसावर प्रभाव टाकणारे पवारसाहेब हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभलेले महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील शरद पवार हे पहिले नेते आहेत.
पवार साहेबांनी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श त्यांनी ठेऊन सुसंस्कृतपणे राजकारण, समाजकारण करीत त्यांनी आपलं नाव गेल्या पन्नास वर्षांच्या कालंखडावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. महाराष्ट्राच्या अर्धशतकाच्या राजकीय इतिहासाचे निर्माते ठरलेले ते एकमेव लोकनेते आहेत.
सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वच जण साहेबांचा वाढदिवस आपापल्या परीनं साजरे करतात.
मागच्या वर्षी पुण्यातील संदीप शशिकांत काळे या रिक्षाचालकाने अनोख्या पद्धतीनं साहेबांचा वाढदिवस साजरा केला. त्याने प्रवाश्यांसाठी मोफत प्रवासाचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी आठ रिक्षा उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रवाशांकडून एकही पैसा न घेता प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचविण्याचे काम केले. यामुळे सर्व स्तरातुन त्याचे कौतुक झाले होते.
साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानाशिबीर, मोफत आरोग्य तपासणी, विविध प्रकारच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, पुस्तक वाटप असे अनेक उपक्रम महाराष्ट्रातील वाड्या, वस्त्या, तालुका, जिल्हा आणि शहरातदेखील मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. शरद पवार साहेबांना १२ डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा अभीष्टचिंतन.