Voting in Rajya Sabha tomorrow for Rajya Sabha biennial elections
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १० जूनला राज्यात मतदान
मतदानाच्या परवानगीसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख उच्च न्यायालयात
मुंबई : महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून इमाम प्रतापगढी आणि भाजपाकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांकडून दिवसभर बैठकांचं सत्र सुरू होतं.
प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या ४१ मतांची गरज आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे ५५ आमदार , राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आणि ४४ आमदार काँग्रेसचे आहेत. विरोधी पक्ष भाजपाकडे १०६ आमदार आहेत. त्यानुसार भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि राष्ट्रीय काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
भाजपाला तिसऱ्या जागेसाठी आणि शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. या आमदारांनी सत्ताधारी किंवा विरोधक यांच्या पारड्यात मतदान केलं, तर दोघांपैकी कोणाचाही उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
या निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षांनं महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदानाच्या परवानगीसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख उच्च न्यायालयात
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत मतदान करता यावं या मागणीसाठी मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याप्रकरणी उद्या सकाळी सुनावणी होणार आहे. मतदानाच्या परवानगी दोघांनी दाखल केलेले अर्ज विशेष PMLA न्यायालयानं आज दुपारी फेटाळले. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार तुरुंगात असलेल्या कैद्यांना मतदानाचा हक्क नाही. शिवाय मतदानाचा हक्क हा मूलभूत हक्क नसून वैधानिक स्वरुपाचा असल्याचे सुप्रीम कोर्टानेही निवाड्यांत स्पष्ट केलेले आहे, असे कारण देत कोर्टानं दोघांचे अर्ज फेटाळून लावले. ‘
मूलभूत हक्क असल्याचा दावा करून नव्हे, तर मतदारसंघाबाबत असलेले कर्तव्य बजावता यावे या उद्देशाने कोर्टाच्या विशेषाधिकारात परवानगी मागत आहोत. केवळ मत टाकण्यासाठी काही तासांकरिता न्यायालयीन कोठडीतून विधानभवनात पोलिस सुरक्षेत पाठवण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती देशमुख,मलिक यांनी केली होती. मात्र त्याला सक्तवसुली संचलनालयानं विरोध केला होता.
हडपसर न्युज ब्युरो