राज्यातल्या जिल्हापरिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर

Results of Zilla Parishad, Nagar Panchayat and Gram Panchayat elections announced.

राज्यातल्या जिल्हापरिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर.Voter Registration - State Election Commissioner.

राज्यातल्या विविध नगरपंचायती; भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद; तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका, आणि ४ हजार ५५४ ग्राम पंचायतींच्या ७ हजार १३० रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले.

गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाला ५३ जागांपैकी २६ जागांवर विजय मिळविण्यात यश आल. तर भंडारा जिल्हा परिषद ५२ जागांपैकी काँग्रेसला २१, राष्ट्रवादीला १३, भाजपाला १२ जागा मिळाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात दोन नगर पंचायतीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे.

सांगली जिल्ह्यात, कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सत्तेला भाजपानं सुरुंग लावला आहे. खानापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आघाडीनं सत्ता मिळवली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीवर काँग्रेस, वैराग इथं राष्ट्रवादी, माळशिरसमध्ये भाजपा, तर नातेपुते आणि श्रीपूरमध्ये स्थानिक आघाडीनं सत्ता मिळवली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १०२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ३९; शिवसेनेनं २५; भाजपनं १३; तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४ जागांवर विजय मिळवला. १८ जागा अपक्षांनी मिळवल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात बोदवड नगर पंचायतीमध्ये १७ पैकी ९ जागा शिवसेनेला, तर ७ राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. एका जागेवर भाजपा उमेदवाराला विजय मिळाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसई – दोडामार्ग आणि वाभवे-वैभववाडी नागरपंचायीतवर भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. तर कुडाळ आणि देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये सत्तेची चावी अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत महाविकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळविलं आहे. मंडणगडमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. सात जागा मिळविलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला असून त्याखालोखाल शहर विकास आघाडीला ६ जागा मिळाल्या आहेत.

सातारा जिल्यातील पाटण, दहिवडी, लोणंद, खंडाळा या चार नगरपंचायतींवर राष्ट्र्वादीने आपले वर्चस्व पुन्हा सिध्द केलं. कोरेगावात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करत १३ जागा ताब्यात ठेवल्या. वडूज नगरपंचायत निवडणुकीत भाजपा ६, राष्ट्रवादी ५, काँग्रेस १, अपक्षांनी ४ तर वंचित आघाडीने १ जागा मिळवली आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचयातीवर काँग्रेसनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. तर भातकुली नगरपंचायतीवर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचं वर्चस्व कायम आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री अॅडवोकेट के.सी पाडवी यांच्या विधानसभा मतदारसंघातील धडगाव नगरपंचायतीवर त्यांना पराभवाचा धक्का देत शिवसेनेने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण नगरपंचायतीच्या निवडणुकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना त्यांच्या घरातील मान्यवरांनीच पराभवाचा धक्का दिला आहे. इथे १७ पैकी ९ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. दिंडोरी नगरपंचायतीत शिवसेनेने ६, राष्ट्रवादीने पाच आणि काँग्रेसने दोन जागा मिळवल्या. तर भाजपाला चार जागा मिळाल्या आहेत.

सुरगणा हा आदिवासी तालुका असून तिथं वर्षानुवर्षे असलेली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मक्तेदारी मोडीत काढत भाजपानं आपला झेंडा रोवला आहे. निफाड नगरपंचायतीत शिवसेना आणि शहर विकास आघाडीने वर्चस्व निर्माण केलं आहे. देवळा नगरपंचायतीत १७ पैकी १५ जागा भाजपने पटकावल्या आहेत. तर पेठ नगरपंचायतीत राष्ट्रवादीने आठ, शिवसेनेने ४ आणि माकपाला ३ जागा मिळाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील  सहा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष वरचढ ठरले आहेत. भाजपाला दोन अंकी संख्या देखील गाठता आली  नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ३८, शिवसेना ३५, शेकाप १२, काँग्रेस ८, भाजप ६ तर अपक्ष ३ जागांवर निवडून आले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. तर संग्रामपुरमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठं यश मिळालं आहे.

परभणी जिल्ह्यात पालम नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं १७ पैकी १० जागा पटकावून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला निर्विवाद बहुमत मिळालं. १७ पैकी १२ जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या तर ३ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नगर पंचायतीवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल आहे. लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने नऊ जागी तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागी विजय मिळवला आहे.बीडमध्ये ५ नगर पंचायतीतल्या ८५ जागांपैकी ४९ भाजपाला, १८ राष्ट्रवादीला, ५ काँग्रेसला आणि २ शिवसेनेला मिळाल्या.

धुळे जिल्ह्यातील साक्री नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १७ पैकी ११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला.पालघर जिल्ह्यातल्या तलासरी, विक्रमगड आणि मोखाडा या तीन नगर पंचायतींच्या ५१ जागांवर झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक २० जागांवर विजय मिळाला.

पुणे जिल्ह्यातील देहूमध्ये नगर पंचायत झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं १४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपाला केवळ १ जागा मिळाली आहे तर २ अपक्षांनी या निवडणुकीत बाजी मारली.

गडचिरोली जिल्हयातील ९ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे.सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी महापौर दिवंगत हारून शिकलगार यांचे पुत्र तोफिक शिकलगार यांचा विजय झाला आहे.या निवडणुकीत आपल्याच पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनं केला आहे. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *