Decrease in the number of daily corona infections in the state.
राज्यातल्या दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत घट.
मुंबई: राज्यात काही दिवसांपूर्वी ४० हजारांच्या आसपास असणारी दैनंदिन बाधितांची संख्या आता काहीशी कमी झाल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर काल नवीन बाधीतांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्याही बरीच जास्त होती. काल दिवसभरात राज्यात २५ हजार ४२५ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर ३६ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल आढळलेल्या बाधितांपैकी जवळपास ७ हजार ८७४ रुग्ण पुणे परिक्षेत्रातील आहेत.
पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४ हजार १७१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून, पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार २०४ रुग्ण, तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १ हजार ४९९ रुग्ण आढळून आले. नागपूर, नाशिक आणि मुंबईमध्येही दीड हजारांपेक्षा जास्त बाधितांची नोंद झाली.
नवी मुंबई, अहमदनगर, सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यातही दैनंदिन कोरोनाबाधीतांची संख्या पाचशेहून अधिक आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरी रुग्ण संख्या शंभराहून अधिक आहे.
तर उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, मालेगाव मनपा क्षेत्रे आणि पालघर, रत्नागिरी, धुळे, हिंगोली, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या खाली आहे.
राज्यात काल दिवसभरात ७२ ओमिक्रोन बाधितांची नोंद झाली. सद्यस्थितीत राज्यात २ लाख ८७ हजार ३९७ उपचाराधीन रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ३२ शतांश टक्के आहे. राज्यात काल ४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत्युदर १ पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे.