राज्यातील नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत शासन निर्णय जारी.
मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल.
नाट्यगृह / रंगभूमीची परिवास्तू (देखाव्यांसहित)सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. नाट्य कलाकारगण आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्व देखाव्यांची व कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज धूम्र फवारणी करणे आवश्यक राहील. देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. मुखपट्टया आणि मुख संरक्षक कवच (फेस शिल्ड) लावणे बंधनकारक आहे, आणि नाट्य कर्मचारीवृंदाला हात स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुक द्रव उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही अतिथींना मग ते कोणीही असोत कलाकारांच्या कक्षांमध्ये जाण्यास अजिबात परवानगी दिली जाणार नाही. ज्या कोणाकडून, जी साधने (संगीत व्यवस्था / लॅपटॉप / माईक / प्रकाश योजना इत्यादी) हाताळली जातील त्यांनीच ती वापरावीत, याबाबत दक्षता घेण्यात यावी. नाट्यगृहांची नियमितपणे स्वच्छता/ निर्जंतुकीकरण / धूम्र फवारणी, इत्यादी करण्यासाठी, सर्व नाट्यगृह व्यवस्थापनांनी उपाययोजना करणे बंधनकारक आहे.