Temperature drops in many places in the state.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट.
मुंबई : राज्यात आज अनेक ठिकाणी थंडीत वाढ झाली. मुंबईत १३ पूर्णांक २ दशांश सेल्सियस किमान तपमानाची नोंद सांताक्रुझमध्ये झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून आज या हंगामातल्या नीचांकी, ७ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात निफाड इथं ६ पूर्णांक १ दशांश अंश सेल्सिअस इतकी यंदाच्या हंगामातल्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला. आखाडा , बाळापूर, वारंगा फाटा, जवळा पांचाळ, दांडेगाव या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यावेळी पावसामुळे हरभरा आणि गहू पिकाचं नुकसानं झालं आहे.
हवामान विभागानं चंद्रपूर जिल्ह्याला ११ जानेवारी रोजी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केलं आहे. त्यानुसार आज जिल्ह्याच्या बहुतांश भागात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर उद्या तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यावेळी नागरिकांनी तसंच शेतकऱ्यांनी शेतातल्या पिकाची काळजी घायवी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.