Maharashtra Health Minister Rajesh Tope says 3rd wave begins in the state.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असली तरीही, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन.
मुंबई: राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असली तरीही, आरोग्य यंत्रणेवर कोणताही ताण आलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या असून या निर्णयामागचा हेतू समजून पालकांनी सरकारला सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
राज्यातील राजकीय नेत्यांच्या विभागाकडून नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच, राजकारण्यांनी नियमांचे पालन करावे आणि राजकीय पक्षांनी या महिन्यात होणारे कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी जवळ जवळ 85 टक्के बाधितांना कोणतीही लक्षणं नाहीत; तसंच उपचाराधीन रुग्णांपैकी दीड ते दोन हजार रुग्णांनाच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल आहे, असं टोपे म्हणाले. राज्यात कोविड प्रतिबंधासाठी नव्यानं लावलेल्या निर्बंधांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं, आणि या निर्बंधांचं पालन करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं.
ते म्हणाले की कोविड प्रकरणांच्या वाढीमुळे कठोर निर्बंध लादले गेले आहेत आणि सर्वात मौल्यवान मानवी जीवन वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे आणि लोकांनी हे समजून घेतले पाहिजे.
दरम्यान गृहविलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी विलगीकरण संच तयार करण्याच्या सूचनाही राजेश टोपे यांनी काल सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. या संचामध्ये सॅनिटायझर, 10 मास्क, माहितीपत्रक, 10 पॅरासिटामोल गोळ्या आणि 20 मल्टि व्हिटामिनच्या गोळ्यांचा समावेश असेल.
गृह विलगीकरणातल्या रुग्णांना पहिल्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी दिवसातून तीनदा आरोग्य विभागाकडून संपर्क केला जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं. राज्यातल्या 523 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी 404 प्रकल्प सध्या सक्रीय असून उरलेले प्रकल्पही येत्या काही दिवसांत सक्रीय होतील, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी काल दिली.