The meteorological department has forecast heavy rains in the next 3-4 days in the state
राज्यात येत्या ३-४ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं
इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : राज्याच्या विविध भागात आजही मुसळधार पाऊस सुरु असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईतल्या हवामान विभाग कार्यालयाचे संचालक जयंत सरकार यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईत रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी भरलंय. त्याचा परिणाम वाहतुकीवर झालाय. लोकल सेवा विलंबानं सुरू आहे तर रस्त्यांवर पाणी भरल्यानं काही ठिकाणी वाहतुक वळवण्यात आली आहे. कल्याण तालुक्यात काल सव्वाशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालघरमध्ये 14 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक कामाशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यानं धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 5 हजार 992 क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता 11 हजार 900 क्युसेक केला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून रात्री ८.०० वाजता १३ हजार १४२ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर हा रस्ता बंद झाला आहे.
दरड हटवण्याचं काम काल रात्री पर्यंत सुरू होतं. पोखरी घाटामध्येही दरड कोसळली होती; ती हटवण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील जवळे इथं घराची भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.
इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील ४८ तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
लोणावळा धरणात जलाशय पातळी ६२३.९८ मीटर झाली असून पाणीसाठा ७.११ द.ल.घ.मी. (६०.७४ टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तथापि, पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान पुणे शहरात पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डयांमुळं प्रमुख रस्त्यांवर सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र आहे.
रत्नागिरीत खेड, देवरुख, मंडणगडमध्ये 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात खोपोली-पाली मार्गावर अंबा नदीवर असलेला पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं रंगावली प्रकल्प ओसंडुन भरुन वाहतो आहे. नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोनशे पेक्षा अधिक कुटंबांचं स्थलांतर केलं आहे. दोन दिवस झालेल्या पावसानं नवापूर तालुक्यातल्या 25 हुन अधिक घरांची पडझड झाली आहे. यामुळं नवापुर तालुक्यातल्या शाळा-महाविद्यालयांना दोन दिवस सुट्या जाहीर केल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात कोयना धरणक्षेत्रासह खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून या भागातल्या शाळा 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील 11 गावांमधल्या 326 कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे. महाबळेश्वरमध्ये 24 तासात अडीचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.
सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरात मुसळधार सुरू असून 24 तासात 88 मिलिमीटर पाऊस पडला आहे. वारणा धरणात 55 टक्के पाणीसाठा झाला आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 17 फुटाच्यावर गेली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा तसंच चूलबंद नदीच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे अर्धा मिलीमीटरनं उघडले असून त्यातून 2 ते 3 हजार क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत दुपारनंतर वाढ सुरू झाली. ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून, पावसानं शहरासह जिल्ह्यातही जनजीवनावर परिणाम झाला. जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकं पाण्यात गेली आहे. अनेक ठिकाणी पाण्यामुळे शेतजमीन खरडून गेली आहे. उमरखेड परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं निंगणूर-फुलसावंगी मार्गावरचा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. ढाणकी, निंगणूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दक्षिण गडचिरोलीत पुरानं हाहाकार माजवला आहे. अहेरी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अहेरीजवळ नागेपल्ली इथं रात्री अनेक जणांच्या घरात पाणी शिरले. आपत्ती निवारण दल आणि पोलिसांनी सुमारे ७० जणांना सुरक्षितरित्या स्थलांतरीत केलं आहे. गडअहेरी पुलाजवळचा रस्ता पुरामुळे तुटल्यानं अहेरी-देवलमरी, बोरी-आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. काल कोरची तालुक्यात बोरी इथं एका युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत अहेरी तालुक्यात सर्वाधिक २०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहानं कवलं आहे.
धुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा धरणातून आज सकाळी ६ वाजता १७ दरवाजे उघडून प्रति सेकंद २२ हजार क्सुसेस विसर्ग सुरु केला आहे. धरणाचे ११ दरवाजे रात्री १० नंतर अर्धे उघडले होते. आता त्यात वाढ केल्यानं पांझरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. आज सकाळी धुळ्यात पुराचं पाणी पोहचल्यानं फरशी पुल, गणपती पुल आणि छोटा पुल असे तीन पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
नांदेड जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शहरातल्या भाजीबाजारात तुरळक दुकानं उघ़डली आहेत. शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प आहे. नाशिकमधे गेली तीन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. दिंडोरी तालुक्यात दोन आणि त्र्यंबकमधे एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सापुतारा-गुजरात रस्त्यावर माळेगाव घाटात दरड कोसळल्यानं सापुतारा मार्गे होणारी महाराष्ट्र- गुजरात वाहतूक ठप्प झाली आहे.