The cold snap intensified across the state.
राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला.
मुंबई : राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड मध्ये आज पाच अंश सेल्सिअस, आणि नाशिक शहरात सहा पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर, कुंदेवाडी इथं नीचांकी ३ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस इतकं तापमान खाली कळवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदलेलेलं हवामान आणि सात दिवसांपासून सुरू असलेल्या गारठ्यामुळे जिल्ह्यातली रब्बी पिकं धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर या हवामानाचा परिणाम होताना दिसून येत आहे. धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे या रोगाची भीती वाढली आहे. सध्या कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रागांमध्ये असणाऱ्या डाब आणि वालंबा परिसरात यंदा दुसऱ्यांदा दवबिंदु गोठल्याची घटना समोर आली आहे. सपाटी भागात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रात आज आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
औरंगाबाद शहर आणि परिसरातही तापमानाच घट झाली आहे. राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.