रायगड रोप-वेची नुतनीकृत सेवा दिव्यांगांना मोफत मिळणार.
पुणे – शिवभक्तांच्या विनंतीला मान देवून रायगडावर थेट हेलिकॉप्टर न उतरवता पायथ्यापासून रोप-वेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सपत्नीक गडावर गेले, याचा सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
यावेळी रोप-वेने राष्ट्रपतींच्या सोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार सुनिल तटकरे देखील होते. राष्ट्रपतींसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तींनी देखील रोप-वे सेवेचा लाभ घेतल्याने हा रोप-वे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत परिपूर्ण असल्याचीच ही पावती आहे, अशी प्रतिक्रीया यावेळी उपस्थितांमध्ये होती.
या रोप-वेच्या नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा गेल्या शुक्रवारी म्हणजे 3 दिवसांपूर्वीच भारताचे पॅरालिम्पिक्सचे पहिले सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून हे लोकार्पण झाल्याने पुढील एक वर्षाकरिता दिव्यांगांसाठी रोप-वे सेवा मोफत दिली जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
या सोहण्याच्यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, हिरकणवाडीच्या सरपंच प्रेरणा सावंत, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, इतिहासतज्ञ प्र.के. घाणेकर, मिलेनियम प्रॉप्रर्टीजचे संचालक देवदत्त चंदावरकर, राजेंद्र जोग व वैशाली जोग आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री.चंदावरकर म्हणाले की, सध्या एकावेळी 12 जणांना रायगडावर जाण्याची व्यवस्था आहे. आता नुतनीकरण करुन अधिक भक्कम स्वरुपात आणि नवीन तंत्रज्ञान वापरुन रोप-वे तयार केला आहे व त्यामुळेच एकावेळी 24 जणांना जाता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र वाढीव क्षमतेसाठी शासकीय परवानगी अद्याप त्यासाठी मिळालेली नाही. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून सर्व तंत्रज्ञान विकसीत करुन हे नुतनीकरण केलेले आहे तसेच नवीन रंगसंगती असलेल्या ट्रॉली देखील जोडण्यात आल्या आहेत.
संचालिका सौ.वैशाली जोग म्हणाल्या की, सुरक्षे संदर्भात खूप सतर्कतेने काळजी घेतली गेल्याने गेल्या 25 वर्षात विनाअपघात रोप-वे सुरु असून सुमारे 25 लाख नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. रोप-वेमुळे स्थानिक रहिवाशांना नोकरी आणि उद्योगाच्या माधमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. 25 वर्षे पूर्ण झालेला रायगड रोप-वे कात टाकून नव्या स्वरुपात सिद्ध झाला आहे.
आमदार गोगावले यांंनी रोप-वे उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले व ग्रामपंचायतीच्या वतीने रोप-वे संचालकांचा सत्कार केला. स्वागत व प्रास्ताविक सुधीर थोरात यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा जोग यांनी केले.