Both Supriya Sule and Praful Patel have been elected as NCP working presidents
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा केला धक्कातंत्राचा वापर .
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा धक्कातंत्राचा वापर केला. दिल्लीतील बैठकीत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची संयुक्तपणी नियुक्ती जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच 2 कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीद्वारे सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज त्यांनी ही घोषणा केली.
शरद पवारांनी घोषणा केली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी मंचावर अजित पवार उपस्थित होते. त्यांनी निर्णय जाहीर होताच टाळ्या वाजवून औपचारिक स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे दोघे कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील असं पवार यांनी सांगितलं. या दोघांकडे पंजाब, हरयाणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांचा प्रभार सोपवण्यात आला आहे.
सुनिल तटकरे – राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, पक्षातील नेते अजितदादा पवार यांच्यावर शरद पवार यांनी कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.
हरयाणात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अलिकडेच दोन खासदारांचे निधन झाले. भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचे आजारपणामुळे निधन झाले. या दोन्ही खासदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडेच या निवडणुकांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
‘माझ्यासाठी कुठलीही जबाबदारी नवीन नाही. मी पवार साहेबांसोबत राष्ट्रीय पातळीवर काम करत आलो आहे. साहेबांनी आणि पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती पार पाडत आलो आहे. ही पदोन्नती म्हणा कींवा आणखी काही, पण ही माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. आनंदाची बाब आहे, पण यात काही नवीन नाही. सर्व जबाबदारी आजपर्यंत मीच पार पाडत आलो आहे. आणि सोबत सुप्रिया ताईलाही कार्यकारी अध्यक्ष केलं, ही चांगली गोष्ट आहे. कारण त्या पण अनेक वर्षांपासून पक्षासाठी महाराष्ट्रात, देशात आणि संसेदत काम करत आल्या आहेत’, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
‘पक्षाला मिळालेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणं ही काही शोभणारी गोष्ट नाही. याचं आम्हाल दुःख आहे. पण राजकारणात चढउतार होत असतात. आता उतार आहे. पण पुढील काळात पक्षाचे आणखी चांगले प्रगतीचे दिवस येतील आणि याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे’, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com