Rashtriya Gramswaraj Abhiyan should be implemented effectively
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी
– ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचा सविस्तर आढावा
मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत दिशादर्शक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक श्री चोक्कलिंगम, संचालक, पंचायत राज श्री. आनंद भंडारी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
मंत्री श्री महाजन यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागात पंचायती राज व्यवस्था विकसित आणि मजबूत करण्यासाठी ही एक अनोखी योजना आहे. गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व शासकीय कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण आवश्यक आहे. मात्र त्यांनी या प्रशिक्षणांना पूर्णवेळ उपस्थित राहावे, अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. पंचायत लर्निंग सेन्टरसाठी आदर्श ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या निधीत वाढ करण्यात येईल. शाश्वत विकास ध्येयांच्या नऊ संकल्पना प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवाव्यात व यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजन करावे असे निर्देश दिले. स्थानिक प्रशासन संस्थांची क्षमता स्थानिक विकासाच्या गरजांप्रती अधिक उत्तरदायी होण्यासाठी, तंत्रज्ञानाचा लाभ घेत सहभागी योजना तयार कराव्यात. स्थानिक समस्यांवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करावा, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
राज्यातील ग्रामीण भागातील शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करुन विद्यार्थ्यांसाठी शाळेत आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी CSR (व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व) निधीच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com