राष्ट्रीय मतदार दिन उप्रकमात मतदारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.
राष्ट्रीय मतदार दिन आयोजनाबाबत आढावा.
पुणे : जिल्ह्यात 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या उप्रकमात मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन आयोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, 25 जानेवारी 2022 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने यंदाचा राष्ट्रीय मतदार दिन शाळा- महाविद्यालयामध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग राहील, या दृष्टीने २५ जानेवारी आधी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करावे, यामध्ये सर्व विभागांचा समन्वय महत्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदार दिनानिमित्त 18 वर्ष पुर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयांचा या उपक्रमातील सहभाग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवक, युवतींनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच ग्रामीण व शहरी मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.