Increase in employment during the National Democratic Alliance government
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात रोजगारात वाढ
– केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात आधीच्या सरकारच्या तुलनेत रोजगारात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली असल्याचं केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आज ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात सरकारी कर्मचारी निवड आयोगामार्फत ४ लाख ६९१ जणांना नेमणुका मिळाल्या तर त्यापूर्वीच्या २००४ ते २०१३ या काळात ही संख्या फक्त २ लाख ७ हजार ५६३ होती अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत गेल्या ९ वर्षात ५० हजार ९०६ नियुक्त्या झाल्या तर त्या आधीच्या १० वर्षात ४५ हजार ४३१ नियुक्त्या झाल्या, असं त्यांनी सांगितलं.
रेल्वे भरती मंडळाने युपीए सरकारच्या काळात ३ लाख ४७ हजार २५१ जणांना नोकरी दिली तर मोदी सरकारच्या काळात ४ लाख ३० हजार ५९४ जणांची भरती केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरन्स धोरण अवलंबत असून प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकाऱ्यांना कामात ढवळाढवळ झाल्याचं वाटू नये याबाबत काळजी घेतात असं जितेंद्र सिंग म्हणाले.
भ्रष्टाचाराविरोधात मोदी सरकार सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात तत्पर असून CPGRAMS या यंत्रणेमुळे भ्रष्टाचाराला चाप लागला आहे. तसंच विविध क्षेत्रात स्टार्ट अप् उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधीची दारं खुली केली आहेत असं त्यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com